Jump to content

पान:Paripurti.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / २३
 

आहे." मीही उल्हासाने पुढे झाले, व नव्या खड्ड्यात उतरून पाहिले तो पिवळसर, गोल असे काहीसे मातीतून बाहेर डोकावत होते. सर्व कामकऱ्यांना दूर सारून लहान सुरी व दाभण ह्यांचे साह्याने माती हळूहळू उकरली व तो पदार्थ मोकळा केला; तो काय, एक मोठा गुळगुळीत गोटा आढळला! आमची निराशा हसण्याखाली लपवून काम पुढे चालू केले. थोड्या वेळाने मला परत बोलावणे आले. “काय उगीच दगड उकरायला बोलावता कोण जाणे!" असे पुटपुटत मी वर आले तो माझे सहकारी वर खड्याच्या काठाशी पुढ्यात एक मोठे ढेकूळ घेऊन बसलेले दिसले. “पाहा पाहा, आम्ही काय काढलं आहे ते! ह्या वेळेला गोटा म्हणून काढला तो कवटीच निघाली!" मी पाहिले तो खरेच त्या मातीच्या डिखळात रुतलेली ती एक कवटी होती. मी ती पुढ्यात घेऊन सुरी-दाभण-कुंचले ह्यांच्या साह्याने साफ करू लागले, व बाकीची मंडळी माझ्याभोवती गोळा झाली. छावणीत प्रत्येकाची कामे ठरलेली होती. चित्रकार व भूपर्यवेक्षक खड्डयाचे, अवशेषांचे फोटो व चित्रे काढीत आणि नकाशे तयार करीत. आमचे मुख्य सर्वांवर देखरेख करीत, पण मुख्यत्वेकरून ते प्रागैतिहासिक काळातील दगडाच्या हत्यारांचे एक निष्णात संशोधक होते. मी मनुष्याच्या कवट्या व हाडे ह्यांचा मुख्यत्वे अभ्यास केलेली होते. म्हणून माणसाचे हाड दिसले की, माझ्या ताब्यात द्यावयाचे असे ठरलेले होते. एकीकडे.मी कवटी साफ करीत होते व एकीकडे तोंडाने माझ्या सहकाऱ्यांना कवटीचे विशेष सांगत होते. "ही पाहिलीत ना मातीच्या दाबानं कवटीची कशी चिपटी झाली आहे? कवटीच्या निरनिराळ्या हाडांच्या शिवणी उसवून मधेमधे फटी पडल्या आहेत." कवटी एका म्हाताऱ्याची होती. दात जिवंतपणीच पडून हिरड्या बुजल्या होत्या. खालची हनुवटी दात जाऊन व हिरड्या झिजून अरुंद झाली होती. दुर्दैवाने म्हाताऱ्याच्या इतर हाडांचे अवशेष फारसे सापडले नाहीत. आता ह्यापुढे स्वच्छ करून फोटो काढावे म्हणजे जास्त बरे असे ठरले. म्हाताऱ्याच्या पाठोपाठच थोड्या अंतरावर एक सबंधच सांगाडा सापडला. त्या माणसाचे हात छातीवर एकमेकांवर ठेवलेले होते. उजव्या हाताचा पंजा डाव्या कोपरावर व डाव्याचा उजव्या कोपरावर होता. पाय मुडपून ठेवलेले होते. पण सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे चेहऱ्याच्या डाव्या बाजूला कपाळापासून तो हनुवटीपर्यंत साफ घाव बसून केवढी फट पडली होती! हाड अगदी कापले गेले होते, व इतक्या सहस्रकांच्या अवधीनंतरही