ते? विषयसुद्धा कोठचा शिकवतो ते धड माहीत नाही, मग बाकीचे काय
सांगणार कपाळ! माझे मन परत घरगुती स्मृतींच्या जाळ्यात गुरफटले.
थोरली मुले आजोबांना भिऊन असत; पण धाकटीला मात्र आजोबा म्हणजे
तिची मालमत्ता वाटते जणू. आणि आजोबांनासुद्धा कितीही कामात असले
तरी तिच्या आग्रही अप्पलपोट्या प्रेमापुढे हार खावी लागते. आजोबाच
काय घरातील प्रत्येक माणूस सर्वस्वी तिचे पाहिजे. संध्याकाळी आम्ही जरा
एकमेकांजवळ बसून बोलत असलो की, हिला ते मुळीच खपत नाही...
ताबडतोब मध्ये घुसते, त्याचे तोंड आपल्या हातात धरते व सांगू लागते,
"बरं का दिनू, आज कनी मला मास्तर म्हणाले..." ती मामाकडे गेली
म्हणजे घरात निवांत बोलत बसता येते. पण आता अगदी दोघांच्याच अशा
गोष्टी बोलाव्यात तरी कुठे लागतात? एकमेकांची मन:स्थिती कळायला
बोलायची गरज आहेच कुठे? पाठमोरा असला तरी नाही का मला समजत
की, आज काही तरी बिघडले आहे म्हणून? मला लांबूनच पाहून तो नाही का
विचारीत, "आज काय ग झालं आहे?" ठण...घड्याळात अर्ध्या तासाचा
ठोका वाजला. ओळख करून देणाऱ्या बाईंची गडबड उडाली. “तेव्हा
ह्या...ची कन्या आहेत. सुप्रसिद्ध महर्षी ह्यांच्या सूनबाई, सुप्रसिद्ध प्राध्यापक
ह्यांच्या पत्नी आहेत, व स्वत:सुद्धा शिकलेल्या आहेत. मी त्यांना आता
भगिनींना चार शब्द सांगण्याची विनंती करते." असे म्हणून त्या झटकन
खाली बसल्या. मला थोडे हसू आले. माझ्या भटक्या मनाला आवरून माझे
भाषण केले व समारंभ आटोपला.
पण बाईंनी करून दिलेली ओळख अपूर्ण आहे व तीत काहीतरी राहिले
ही हुरहूर मनाला लागली ती काही जाईना. दोन दिवसांनी मी घाईघाईने
रस्त्यातून जात होते. संध्याकाळ संपत आली होती, पण रात्र अजून पडली
नव्हती. रस्त्याच्या कडेने मुलांचे घोळके घराच्या दारापुढून उभे होते. चार
भितीच्या कोंडवाड्यात जाण्याचा क्षण ती जरा पुढे ढकलीत होती. त्यांच्या
गप्पांतील शब्द अधूनमधून माझ्या कानांवर येत होते. इतक्यात जवळच्याच
एका घोळक्यातून शब्द ऐकू आले, “अरे, शू:, शूः, पाहिलीस का? ती बाई
जाते आहे ना, आपल्या वर्गातल्या कर्त्याची आई बरं का..."
...मी थांबले. पण चुटकी वाजवली. त्या दिवशी बाईंनी सांगितलेली
ओळख आज पुरी झाली. बाई हे सांगायच्या विसरल्या होत्या, नव्हे का?
पान:Paripurti.pdf/143
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १५७