Jump to content

पान:Paripurti.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८
परिपूर्ती

 “आपल्या आजच्या व्याख्यात्या श्री....
ह्यांच्या कन्या आहेत..."
 माझी ओळख करून देणाऱ्या बाईंच्या
बोलण्याला सुरुवात झाली. त्यांचे बोलणे मी
अर्धवट ऐकत होते; पण मन मात्र बाईंच्या
बोलण्याने जाग्या झालेल्या स्मृती आणि कल्पना
ह्यांत गुंतले होते. “एकदा लग्न उरकून टाकले
म्हणजे जबाबदारी सुटली" असे बाबांचे बोलणे
मॅट्रिकच्या वर्गात असल्यापासून ऐकले होते.
माझा पुढे शिकण्याचा हट्ट, बाबांचा त्रागा, शेवटी
"कर, काय वाटेल ते कर" ह्या शब्दांनी मोठ्या
कष्टाने दिलेली परवानगी हे आठवले व तीच
भाषा, तेच भांडण आणि तोच शेवट दरवर्षी
परीक्षेच्या शेवटी कसा व्हायचा... हे आठवून
क्षणभर हसू आले. ते रागात आले म्हणजे अस्सल
प्राकृतात पाच-पन्नास शिव्या हासडून बोलत.
आम्ही जरा मोठी झाल्यावर तर रोज ह्या नाही त्या
गोष्टीवरून वादविवाद व शेवटी भांडण ठरलेलेच
होते. ते जितके तापट तितकी आई शांत. त्यांनी
म्हणावे, “ह्या पोरांच्या तोंडास तोंड देण्यानं
टेकीस आलो." तिने म्हणावे, “सगळी तुमच्या

वळणावर गेली आहेत," की त्यांनी चूप बसावे.