पान:Paripurti.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६ / परिपूर्ती
 

गौरी धापा टाकीत आली. नेहमीप्रमाणे पुढे न पाहता धडक मारून येत होती. खोलीत येतायेता टेबलाच्या अणकुचीदार कोपळ्यावर आता डोळा आपटणार असे मला दिसले व मी हातातले काम टाकून "अग, अग..." म्हणत उठले तो काय चमत्कार! टेबल गहूभर मागे सरकले व गौरी डोळ्याला न लागता माझ्यासमोर येऊन थडकली. छे! टेबल कसे सरकेल? मला काहीतरीच भास झाला. थोडक्यात पोरगी बचावली खरी. पण टेबल सरकल्यासारखे दिसल्यामुळे मी इतकी बावचळले होते की, मला ती काय सांगत होती ते समजलेच नाही व तिला बोलायचेही मी विसरले. संध्याकाळची वेळ, खोलीच्या मध्यभागी उभा राहून नंदोबा काहीतरी शाळेतली हकीकत अगदी रंगात येऊन सांगत होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे सारी गोष्ट सांगून होत आल्यावर मागे मागे जात दारातून बाहेर पडणार होता. दाराची एक फळी अर्धवटच उघडी होती व नेहमीप्रमाणेच नंदूचे डोके धाडकन त्यावर आपटणार होते "नंद्या, नंद्या" म्हणून मी ओरडते आहे तो आपले दार हळूच उघडून भिंतीसरसे झाले व नंदोबा सुखरूप दाराबाहेर पोचले! दार कोणी उघडले म्हणावे तर दाराशी तर कोणीच नव्हते! मग काय दार आपणहूनच बाजूला झाले, मला भ्रम झाला? बाकीच्यांच्याकडे पाहिले तर काही विशेष झाल्याचे कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नव्हते. झाला प्रकार इतका विलक्षणं की मी कोणाजवळ बोललेच नाही- झाली गोष्ट मनात ठेवावी व काय होते ते पाहावे असे ठरवले. पुढचे दोन दिवस मी स्वप्नात तर नाही ना असे मला सारखे वाटत होते. मुलांचे डोके आपटणार एवढ्यात भिंती आत वाकत व त्यांना लागण्याचे टळे; बागेत दगडाला ठेचाळणार तो दगड बाजूला होई खुर्च्या, टेबले, पलंग घडवंच्या चटदिशी मागे सरकायच्या नाहीतर अंग चोरायच्या दोन दिवसात कोणाला काही लागले नाही
 मुलांच्या लक्षात येणे काही शक्यच नव्हते, पण त्यांच्या वडिलांना तरी काही दिसले असेल म्हणून मी विचारले, "तुझ्या ध्यानात आलं का गेले दोन दिवस पोरं कुठं धडपडली नाहीत ते?-आश्चर्य आहे, नाही?" वर्तमानपत्रात खुपसलेले डोके काढून तो म्हणतो, "त्यात काय आहे एवढं? तू परवा खूप रागावलीस म्हणून जपून चालत असतील." आता मात्र कमाल आहे ह्या गृहस्थाची! माझ्या रागावण्याने पोरे धडपडायची आणि हा वर्तमानपत्रात डोके घालून बसायचा थांबला तर काय हवे होते? त्याला विचारण्यात अर्थ