पान:Paripurti.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १५३
 

पांडुरंगी माझ्या भावो.' तिच्या भजनात सगळ्यांनी आपला सूर मिसळला. म्हातारीही बघताबघता आमच्यात सामील झाली. तिच्या कापऱ्या आवाजाने साथ दिली, “आण तुझी पंढरीरावो." थोड्या वेळाने दुःखाच्या सावल्या जाऊन परत प्रसन्नता आली. अशी सर्वांना दु:खे होती, पण सारीजणे एकमेकांच्या साहाय्याने आनंदमय वातावरण कसे निर्माण करीत कोण जाणे!
 धर्म ही एक अफू आहे! मानवी संस्कृतीने अशी कित्येक तऱ्हेची अफू व दारू निर्माण केली आहे. अफू खाऊन मनुष्य गुंगून पडतो- दारू पिऊन मस्त होतो. वास्तवता विसरण्याचाच सर्व प्रयत्न. कोणी देव निर्माण करते, कोणी शास्त्र निर्माण करते, तर कोणी राजकीय पंथ निर्माण करतात. शास्त्राच्या अभ्यासात सर्वस्व विसरणारे सहस्रावधी शास्त्रज्ञ अफू प्यायलेलेच नाहीत का? अर्वाचीन शास्त्रामुळे मानवांचे आयुष्य आनंदमय झाले ही घोषणा करणारे ज्ञानमदिरेने धुंद झालेलेच ना? समाजाची पुनर्रचना करून समाजाची दु:खे नाहीशी करणारे महान तत्त्ववेत्ते बुद्धापासून मार्क्सपर्यंत होऊन गेले, पण जुनी दु:खे तर नाहीशी होत नाहीतच, नव्याची मात्र भर पडत जाते व मनुष्य अफूने का दारूने ती विसरून म्हणतो, "आमची प्रगती झाली. आनंदमय संसाराची पहाट उगवली...."
 तो वाटचालीचा शेवटचा दिवस. संध्याकाळी इतक्या दिवसांची सोबत सुटणार- जे ते गावात आपापल्या मुक्कामाला जाणार. मला हुरहूर लागली होती.... माझे डोळे परत परत भरून येत होते. हौशी मला म्हणाली हाता, बाई, शेवटच्या माळाला 'रडवा माळ' म्हणतात." "का ग?" त्यावर चालायला लागलं की आपलं रडूच येतं बघा." सगळीकडे निरोप घेणे चालले होते. माझ्या तोंडाने शब्द फुटत नव्हता. मी मानेनेच दिंडीतल्या मंडळीचा निरोप घेऊन पढे निघाले. गावाची शीव आली. मला चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. इतके दिवस दिंडीत कधी पुढे, कधी मागे, तर कधी झाडाखाली. तर कधी ओढ्यावर सर्वांबरोबर असणारा तो जवळ दिसेना. मी वळन पाहिले तो तो पाठ फिरवून मागे निघाला होता, मी म्हटले, "काळ्या, बाबा, तू पण सोडून चाललास का रे? पंढरपुरात नाही का येणार?" त्याने हसून मान हलवली. “मग चाललास कुठे?" काही न बोलता त्याने सभोवार हात फिरवला व तो झपाट्याने चालू लागला! खालची नांगरलेली शेते, वर ढगांनी भरलेले आकाश. खांद्यावर घोंगडी