Jump to content

पान:Paripurti.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५० / परिपूर्ती
 

त्यांनी मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग सुरू केले - "ताटी उघडा ज्ञानेश्वरा” ह्या पालुपदाने अशीच मी माझ्या उदासीनतेतून जागी झाले होते. एकदा संध्याकाळचा टप्पा बराच लांब होता. सूर्य कलला तेव्हा भर उन्हात चालून चालून माणसे थकली होती. हरिपाठ होऊन इतर किरकोळ अभंग झाले होते, पण श्रमाने म्हणा, उन्हाने म्हणा नेहमीचा आनंद वाटत नव्हता, तोच बुवांनी "आम्ही लटके ना बोलू वर्तमान खोटे' सुरू केले. सगळ्यांची तोंडे खुलली आणि लहापणापासून ऐकलेले, असंभाव्य घटनांनी भरलेले ते पद म्हणता म्हणता, हसता हसता वाट कधी सरली ते कळले नाही.
 रंगणे चालली म्हणजे सर्कशीचा भास होई. खेळ सुरू झाले म्हणजे उत्साहाने वाटचालीचे दु:ख नाहीसे होई. भारूडांचे नाट्य मधून मधून चाले व कधी वैराग्यपर कविता, तर कधी देवाचा धावा, तर कधी “लटके ना बोलू' सारखी नितांत असंभाव्य पदे व अखंड हरिनामाचा गजर ह्यांमुळे सारखी वाटचाल करूनही मन प्रसन्न होते.
 म्हणजे काय सर्व वाटसरू आनंदात होते? मुळीच नाही. ही भागीदारी, हे सहजीवन आनंदाचेच नव्हे तर दु:खाचेही होते. किती दुःखीकष्टी माणस पंढरीच्या वाटेवर चालत होती! ह्या वाटेवर नेहमी हृदयात बाळगलेली दुःख ती दुसऱ्यांजवळ सांगत होती, भरलेले अंत:करण हलके करीत होती, आणि वेदना सहन करण्याचे सामर्थ्य आणीत होती. दु:ख तरी किती- प्रत्येकाच दुःख निराळे आणि प्रत्येकाचे दुसऱ्यासारखे.
 किती सुरेख होती ती बाई! किती गोड बोलणे! एक दिवस आम्ही झाडाखाली सुख-दुःखाच्या गोष्टी बोलत बसलो होतो. बायांच्या गोष्टी काय असणार? तुमचे मालक काय करतात? तुम्हाला मुले किती? असल्याच प्रश्नांची उत्तरे दिल्यावर मी पण तेच प्रश्न विचारले. भरल्या डोळ्यांनी तिने सांगितले, “नाही हो. माझ्या घरी मलं नाहीत हो खळत. एवढा मोठा वाडा.. एकीकडे मालक, एकीकडे मी. भांडण नाही, काही नाही; पण बोलणार तरी काय एकमेकांशी? जाते झालं पांडुरंगाच्या पायाशी." मी हळूच विचारले, “देवाच्या पायांशी गा-हाणं घालायला जाता का?" "छे:! छे:! त्याला काय ठाऊक नाही? त्याच्या मनात असल ते करील. त्यानं ठेवलं तसं राह्यला पाहिजे."
 एकदा दुपारच्या जरा विसावलो होतो. शेजारीच दोन-चार बाया- पुरुष व एक तान्हे मूल अशी होती. एका बाईने मुलाला प्यायला घेतले होते