पान:Paripurti.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १४९
 

सगुणत्व देणारा, इतकेच काय तर ती सगुण, गोजिरी मूर्तीच श्रेष्ठ असा अट्टाहास बाळगणारा वारकरी पंथ- अनेक स्त्रियांचा उपभोक्ता श्रीकृष्ण त्यांचा देव-- 'जर विठोबा-रखुमाई' असा दांपत्यनामाचा घोष- अर्जुनाला प्रवृत्तिपर बनविण्यास कारणीभूत झालेली गीता त्यांचा आधारभूत ग्रंथ, आणि शिकवण काय; तर ब्रह्मचर्याची- निवृत्तिमार्गाची- हा मेळ कसा घालायचा? “प्रजाभिः प्रजायस्व" ("प्रजेच्या रूपाने परत जन्म घे. प्रजेच्या रूपाने अमर हो.') ही वेदाची शिकवण होती. पुत्रकामेष्टी करणारे असंख्य यजमान धुराने कुरु-पांचालांची पवित्र भूमी अंधारीत होते. औरस संतती नसली तर निरनिराळे चांगलेवाईट मार्ग पुत्रप्राप्तीसाठी मनूने सांगितले; एवढेच काय तर “उपनयनविधीपासून बारा वर्षे ब्रह्मचर्याने राहून गुरुगृही विद्या शिकावी. एखाद्या शाखेत विशेष पारंगत व्हायचे असेल तर आणखी काही वर्षे व्रतस्थ राहून वेदाभ्यास करावा. पण ह्यापुढे ब्रह्मचर्याचा उपदेश करणारे लोक नपुंसकच असावे." असे अगदी स्पष्ट मत शबरस्वामींनी दिले आहे. पण गृहस्थाश्रमाची थोरवी वर्णन केली जात असता एकीकडे अरण्यवास व उपनिषदातील तत्त्वज्ञान परिणत होत होते. बुद्ध व जैन संप्रदाय ह्या तत्त्वज्ञानाच्या आधारे कर्ममार्गाचा हीनपणा दाखवून संन्यासमार्गाचा प्रसार करीत होते. पण संन्यास मार्गाची भरभराट एका सामाजिक विरोधावर अवलंबून असते. भिक्षावृत्तीने संन्यस्त अवस्थेत राहणाऱ्या सांप्रदायिक स्त्री- पुरुषांची (मग ते जोगी, संन्यासी, भिक्षू, श्रमण, कोणीही असोत) उपजीविका संपन्न राजकुळे किंवा वैशाली, श्रावस्ती व चम्पा अशा समृद्ध शहरात राहणाऱ्या श्रीमान व्यापाऱ्यांकडूनच होते! समृद्ध व सुखी गृहस्थाश्रमावरच संन्यासधर्माची उभारणी शक्य होते! हिंदूंच्या सामाजिक जीवनात ही जी मूल्यविषयक क्रांती झाली त्याचा इतिहास जितका महत्त्वाचा तितकाच मनोरंजक आहे; पण मदालसेसारखी गाणी मनोरंजकही नाहीत आणि उदात्तही नाहीत.
 मदालसा संपून काही वेळ लोटला होता. एकंदर वातावरणात मला फरक वाटला. क्षणभरात ठेक्यावर नाचत, खुल्या गळ्याने म्हटलेले शब्द ऐकू आले, “बोल रे काऊ, तुझे सोन्याने मढवीन पाऊ" कारण काय तर “पाहणा पंढरीराऊ" आणीत आहेस. ज्ञानेश्वरांची ओवी चालली होती. मदालसेचे जड वातावरण जाऊन हवा निवळली. मन परत प्रसन्न झाले. आमचे दिंडीतले मुख्य नेहमीच हा विवेक दाखवीत. एकदा मदालसेनंतर