पान:Paripurti.pdf/131

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / १४५
 

अंत:करणातील काव्य, मांगल्य, सदभाव निरनिराळ्या त-हेने प्रकट करतात व ह्या बहुरूपात त्याची ओळख करून घेणे- आपले तेच खरे हा आग्रह धरण्याआधी लोकांचे काय हे अगदी मनापासून समजून घेऊन त्यांच्याशी समरस होणे- हेच नव्हे का संस्कृतीचे लक्षण? “ऐशा कळवळ्याची जाति करी लाभावीण प्रीती'- अंतिम लाभाची आशा न धरता सर्व मानवतेविषयी जिव्हाळा वाटणे हीच नव्हे का संस्कृती? पण एकेश्वरी पंथाच्या- मग तो राजकीय, सामाजिक वा नैतिक असो- अनुयायांना हे पटणार कसे? सबंध दान-तीन शतके सर्व जगातील लहान-मोठ्या समाजावर स्वामित्व. त्यांची मूल्ये पायदळी तुडविणाऱ्या ख्रिस्त सेवकांना तर हे पटण्याचा सुतराम संभव नाही.
 ह्या निरक्षर बायांना किती गाणी, अभंग, भारुडे पाठ होती त्याचा तर मला पत्ताच लागला नाही. सबंध प्रवासात तेच गाणे काही मी परत ऐकले नाही. गाणी उतरवून घेण्याचा सारखा मोह होत होता. पण कागद, पेन्सिल वा पुस्तक ह्यांना हातात धरायचे नाही असा निश्चय करून निघाले होते ना! तशी बायकी गाणी काही सोडली तर सर्व गाणी वारकरी पंथाचीच होती. त्यांचे प्रकार तरी किती? गोंधळ, खेळिये, गौळणी सगळे काही त्यात होते. एक बाई मला म्हणाल्या, “अहो, ही युनिव्हर्सिटी आहे. तुमच्या विद्यार्थ्यांना तरी हे शिक्षण व ही शिस्त आहे का?" त्यांचे बोलणे मला कबूल नव्हते. पण युनिव्हर्सिटी नाही तरी पारंपारिक ज्ञानाची जोपासना, सवर्धन व पुढच्या पिढीत संक्रांती ही शिक्षणाची तीन अंगे प्रकर्षाने त्यात होती, ह्यात संशयच नाही. हे शिक्षणसद्धा अनेकविध होते. धर्म व तत्त्वज्ञान खाखराज, गायन, नर्तन व नाट्य ह्या तिन्ही कलांचा समावेश त्यात होता; शिवाय सर्व समाजाचे एकत्र जीवनही त्यात होते. गायन विशेष उच्च दर्जाचे होते असे नाही, पण पारंपरिक भजनी चालीखेरीज मृदंगाच्या तालात किती तरी निरनिराळ्या रागांत अभंग म्हणत असत. भैरवी, काफी, भूप, सारग, जयजयवंती दुर्गा, मालकंस असे किती राग कानावरून गेले! फलटणहून निघालो.त्या दिवशी पहाटे पाऊस पडत होता. फलटणचे एक गायक आमच्या दिंडीबरोबर मैल-दोन मैल आले होते. सकाळचे अभंग विशेषच गोड असतात व त्यांनी आळवलेले व भजनी मंडळींनी त्यांच्या पाठोपाठ म्हंटलेले सूर व अभंगाचे जयजयवंतीचे शब्द अजून माझ्या कानात घुमत आहेत. वरून येणारा पाऊस, खालचा चिखल, इकडे मुळी लक्षच गेले नाही.