पान:Paripurti.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४ / परिपूर्ती
 

निघाली तेव्हा पुणे, जुन्नर, मोगलाई, सातारा, वगैरेकडचे लोक होते; दर मुक्कामाला नवे नवे लोक येऊन मिळत होते. खानदेश, सोलापूर, नाशिक, व-हाड- सगळीकडून प्रवाह घेऊन जसजशी पंढरी जवळ येत चालली तसतशी यात्रा वाढत चालली. सगळी माणसे मराठी होती- निरनिराळ्या जातींची होती, पण एकाच वारकरी पंथाचे अभंग म्हणत होती, एकमेकांशी बोलत होती, एकमेकांना मदत करीत होती, एकमेकींना गाणे म्हणून दाखवीत होती. फक्त मंडळी दिसत नव्हती कोकणची. मी चौकशी केली तर मला कळले, आषाढीला यात्रा देशावरची, तर कार्तिकीला पंढरीला सबंध कोकण लोटते; आता त्यांची भाताची वेळ, ते शेत सोडून कसचे येतात? देशावर शेते नांगरून पडली होती, पण पेरे होण्यास अवकाश होता. त्याचा भक्ती पूर्ण होती, आत्मघातकी खासच नव्हती. मी जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रभर फिरले आहे, पण सर्व देशाचे एका वेळी, एका ठायी होणारे दशन मला अदभुत वाटले. “ज्या देशातील लोक पंढरीला येतात तो महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची एक नवी व्याख्या मला कळून आली.
 त्याचप्रमाणे निरक्षर लोकांत सांस्कृतिक परंपरा कशी पसरते व दृढमूल होते ह्याचा एक धडा नऊ-दहा दिवस रोज मला मिळत होता. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, नाथांच्या ओव्या, नामदेवाचे व तकारामाचे अभंग, जनाई मुक्ताईचे कारुण्यपूर्ण गोड काव्य, अशी मराठ्यांची उत्तमोत्तम काव्य म्हणत लोक आपली वाणी गोड व शुद्ध करीत होते व मने सुसंस्कृत करीत होते. ते आपला मार्ग हसत-खेळत आक्रमीत होते. लोकांनी यावे म्हणून त्यांचा आग्रह नव्हता. पालखी जाणार म्हणून जाहिराती लागल्या नव्हत्या, त्यांना बाहेरच्या जगाची पर्वा नव्हती. ते आपल्यातच धंद होते. मस्त होत. ज्याला अंतकरण असेल, ज्याला सौंदर्यसृष्टी असेल त्याला हा आनंद लुटायची मोकळीक होती. सुसंस्कृत व साक्षरता यातील फरक एके दिवशी मला विशेष जाणवला. आमच्या दुपारच्या मुक्कामी बसलो असता सहज रस्त्याकडे दृष्टी गेली तो एक पाद्याचे जोडपे दिसले. त्यांच्या हातात लहान लहान पुस्तके होती. प्रभू येशूच्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ती आली होती. दोन-तीन दिवसांनी कंटाळून ती निघन गेली असावी, कारण ती पुढे दिसली नाहीत. मला त्यांची चीड आली होती, पण आमच्या मंडळींनी सर्व हसून घालवले. ते जोडपे साक्षर खात्रीने होते. पण संस्कृतीचा लवलेशही त्यांच्याजवळ नव्हता. निरनिराळे मानवसमाज आपल्या