Jump to content

पान:Paripurti.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२ / परिपूर्ती
 

मला दिसला. पालखीपुढं अर्धा मैल, मैल जाऊन एखाद्या झाडाखाली बसायचे असा बऱ्याच जणांचा प्रघात होता. झाडाखाली निरनिराळ्या ठिकाणची बायामंडळी जमत, मग एकमेकींना गाणी म्हणायचा आग्रह चाले. गाण्यांच्या कथावस्तूवरून, ते म्हणण्याच्या व बोलण्याच्या लकबीवरून, कोठची बाई कोण्या प्रदेशातील असावी ह्याचा कयास बांधण्याचा माझा प्रयत्न चाले व मागून विचारून माझा तर्क बरोबर आहे असे कळले म्हणजे मी फार खुशीत असे. एकदा अशीच बसले होते, तो “मले, तुले' शब्द कानावर आले म्हणून झटदिशी उठून त्या माणसांत गेले. “तुम्ही खानदेशच्या का हो?" "नाही, आम्ही घाटावरल्या." "असं होय?" म्हणून मी तेथेच बैठक मारली. माझ्याबरोबर पुण्याकडच्या बाई होत्या त्या म्हणाल्या, “ह्या तर मावळातल्यासारखं बोलत नाहीत, मग घाटावरच्या कुठल्या?" मी म्हटले, “घाटावरल्या म्हणजे औरंगाबादच्या बाजूच्या, नाही तर बुलढाण्याकडच्या." माझे बोलणे ऐकून त्या बाया खुलल्या. त्यांच्या मुलखाची मला माहिती आहे असे वाटून त्या पुढे म्हणाल्या की "आम्ही वेरूळच्या बाजूच्या." मी विचारले, "तुम्ही कोण्या जातीच्या?" "आम्ही वारीक." मी म्हटले, “आम्ही वारीक, वारीक, करू हजामत बारीक." खुदकन हसून बाईंनी मान हालवली व म्हटले. "वा! घरची खूण समजली की!" त्या मेळाव्यात बाया, पुरुष, लहान मुले मिळून जवळजवळ पन्नास माणूस न्हाव्याचे होते व सगळी माणसे गाडीने पुण्यास येऊन आळंदीपासून पालखीबरोबर चालत होती.
 अशीच एकदा झाडाखाली बसले होते. दोघी-तिघी बाया मिळून गाणे म्हणत होत्या. “श्रीशैल्या पर्वता जाऊ, चला गडे मळकार्जुन पाहू. हे गाणे पुणे-सातारच्या बाजूला फारसे ऐकायला येत नाही. "का हो, तुम्ही कानडी मुलखातल्या का?" "छे! नाही! आम्ही मोगलाईतल्या, मराठी मुलखातल्या, पण कानडी मुलखाला जवळच." असे त्यांनी सागितले.
 काही बाया-पुरुष बीड, बिदर, परभणी, जालना-थेट नांदेडपासून आले होते. “आम्ही गंगथडीचे" म्हणून ते सांगत. एक दिवस सकाळी रस्त्याने जात होतो. आमच्या पुढेच एक बैलगाडी सामानाने भरली होती व सामानाच्या वरच तीन-चार चिल्यापिल्यांना बसवले होते. त्यातला एक मलगा आकान्त करीत होता. त्याला गाडीत बसावयाचे नव्हते व त्याच्या आईने त्याला तसेच आत कोंबले होते. तो हात-पाय झाडून मोठा गळा