पान:Paripurti.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२ / परिपूर्ती
 

नगराच्या घराची पडवी होती. पडवीपुढच्या बाजूला अंगणात सोवळ्याने स्वयंपाक चालला होता. मध्ये एक तीन फूट उंचीची भिंत होती. त्याच्यापलीकडे जरा मोठी पडवी होती. तेथे मराठे मंडळींचा स्वयंपाक त्यांच्यातल्या बायका करीत होत्या. मला दाखवल्या जागी मी गुपचूप जाऊन बसले. इतक्यात कोणीसे म्हणाले, “वाजले किती?' प्रश्न ऐकून मी चपापलेच. वारीला जाताना घड्याळाची उपाधी नको म्हणून ते मी घरी ठेवले होते. पण तेथील एका बाईजवळ घड्याळ होते, त्यांनी सांगितले, “साडेअकरा.” "मग आटपा लवकर. पालखी निघण्याच्या आत जेवण आटोपून, भांडी घासून, मोटार पुढे गेली पाहिजे." सोवळ्यातून उत्तर आले, “सर्व तयारी आहे, फक्त जेवणारांचीच खोटी आहे." एवढ्यात जेवणारे पुरुष- आमच्यातले तीन ब्राह्मण गृहस्थ- सोवळे नेसून जेवावयास आले व भिंतीपलीकडे मराठे मंडळीही जेवावयास बसली. आमचे दिंडीवाले जेवून गेल्यावर सोवळ्यातल्या बायकांनी वाढून घेतले व स्वयंपाक ओवळ्यात घेऊन आम्ही इतरजणी बसलो. जेवणे झाल्यावर ओढ्यावरून भांडी घासून आणली. ती पोत्यातून बांधली व पोती मोटारीत टाकली. मराठे मंडळाचही आटपले होते. त्यांचेही सामान मोटारीत गेले होते. मोटार पुढे गेली. आम्ही विहिरीवरून पिण्याचे पाणी भरून आणले व पालखी निघण्यास वेळ हाता म्हणून बायका जरा लवंडल्या. मी काही चालून थकलेली नव्हत, न भिंतीला टेकून बसले व माझी पुढील काही दिवसांची सोबत कोण कोण आहे ते पाहू लागले.
 आम्ही एकंदर नऊ-दहाजणी होतो. पैकी तीन वयस्क सोवळ्या बायका, इतर सहा-सातजणी मध्यम वयाच्या व एक- ताई... अगदीच पोर होती. पुढल्या मुक्कामाला आणखी दोन-तीनजणी येऊन मिळाल्या. भिंतीपलीकडे पुरुषांच्या बैठकीत एक गृहस्थ होते. त्यांना आम्हा काका म्हणत असू. हे भजनी दिंडीत होते. ते हिशेब बघत. काय वस्तू आहे-नाही बघत, पण वास्तविक बाजारहाट स्वयंपाकपाणी बायकाच करीत. काकांची मदत असे इतकेच. आणखी एक गृहस्थ होते. ते प्रसिद्ध प्रवचनकार असून दिंडीतील सर्व मंडळींना गुरुस्थानी होते. ते फक्त जेवणास व संध्याकाळच्या फराळापुरते यावयाचे. त्यांचे बसणे-उठणे इतर भजनी मंडळीत असे. त्यांच्याच कृपेने मी आज ह्या समुदायात आले होते. ताई माझ्याजवळ बसून मला बायांची नावे त्या कोठल्या गावच्या; वगैरे सांगत होती. पलीकडे