पान:Paripurti.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२३ / परिपूर्ती
 

त्यांच्या ताब्यात जाणे बरे नव्हे, वगैरे. इतक्यात खोलीच्या एका कोपऱ्यात कोणी तरुण पोलीस, “गावभवानी तर आहे..." असे काहीसे पुटपुटला. क्षणार्धात कोर्टात भडका उडाला. इतका वेळ आळसट दृष्टीने पाहणारी ती बाई खाडदिशी जागी झाली. ती ताडताड त्या पोलिसाकडे गेली व त्याच्याकडे हात नाचवून तिने त्याच्यावर शिव्यांचा असा भडिमार केला की, बोलून सोय नाही. ती जे बोलली ते ऐकून बिचारा आमचा प्रोबेशन ऑफिसर शरमेने लाल झाला. आमच्या कानावरच्या शिरा सणसणायला लागल्या. शेवटी मॅजिस्ट्रेटने हुकूम केल्यावर, बॅरिस्टरने मध्यस्थी केल्यावर, ती बाई शांत झाली व जणू काय काही झालेच नाही अशा आविर्भावाने परत विडा चघळीत उभी राहिली. मिनिट दोन मिनिटात हा प्रकार झाला. माझ्या मिशनरी सहचारिणीला काय झाले ते कळले, पण ती बाई काय बोलली ते कळणे शक्यच नव्हते. तिने मला विचारले, “काय हो, काय बोलत होती ती?" "छे! छे! ते भाषांतर करण्यासारखे नाही- आणि मला तरी कुठ सगळे कळले आहे ती काय म्हणाली ते!" मी उडवून लावले. त्या बाईला ठेवायचे कुठे असा प्रश्न पडला- तो काय आश्चर्य! माझी सहकारिणी म्हणाली, "हे पाहा, दोन पोलीस पहाऱ्याला देत असाल तर बाई माझ्या बंगल्यात राहू दे." आम्ही सगळी चकित झालो. पण तिचे मनापासून आभार मानून बाई तिच्या स्वाधीन केली.
 दुसऱ्या दिवशी मी आले तो तीही येऊन पोहोचली होती. पुरुष मॅजिस्ट्रेटना यायला अवकाश होता म्हणून आम्ही बोलत बसलो. आज माझ्या सहकारिणीची वृत्ती का कोण जाणे उत्तेजित दिसत होती. डोळ्यात चमक होती, तोंडावर किंचित हसू, किंचित धास्ती, किंचित समाधान असा काही चमत्कारिक मिश्र भाव दिसत होता. तिने आपली खुर्ची माझ्याजवळ ओढली व मला म्हटले, “काय विलक्षण अनुभव! कालची रात्री मी कधी विसरणार नाही!" "म्हणजे? काय झाले?" मी चकित होऊन उदगारले. "अहो, मी रात्रभर त्या वेश्येला माझ्याच खोलीत ठेवली होती..." माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहून ती घाईघाईने पुढे म्हणाली, “मीच पोलिसाकडून दसरी खाट आणवली व ही व्यवस्था केली, म्हणजे तिने पोलिसांशी संगनमत करून पळून जायला नको म्हणून.” “मग तिने तुम्हाला शिव्याबिव्या देऊन मारण्याचा प्रयत्न केला की काय?" मी काळजीच्या स्वरात विचारले. "छे! ती जेवून डाराडूर निजली ती सकाळी आठ वाजेपर्यंत. हालवून हालवून जागे