पान:Paripurti.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२ / परिपूर्ती
 

संख्या जास्त व पगार कमी. हिंदूंना वाटते, मुसलमान वाढत आहेत, आम्ही का नको? रोमन कॅथॉलिकांनी तर जास्तीत जास्त प्रजोत्पत्ती करून जगच व्यापण्याचा चंग बांधला आहे. त्यांच्या सर्व भाषांतील वर्तमानपत्रांतून व मासिकांतून मोठ्या कुटुंबाचे फायदे वर्णन करणारे लेख येत असतात. मजूर पुढाऱ्यांना वाटते, जितकी खायला तोंडे जास्त तितकी उपासमार जास्त, जितकी उपासमार जास्त तितकी अशांतता व क्रांतीची बीजे पेरण्यास योग्य भूमी; म्हणून तेही लोकसंख्येबद्दल बोलत नाहीत. शिवाय, लोकशाहीच्या काळात एका माणसाला एक मत असते व ते आंधळ्या, लुळ्या, रोगी, मरणप्राय माणसाचे असले तरी त्यांची किंमत एकाच मताची. म्हणून निरनिराळ्या पक्षांना व धर्मांना आपल्या पक्षाची, धर्माची वा जातीची लोकसंख्या जास्तीत जास्त हवी असते. चालत्या प्रेतांनी मते दिली तरी त्यांना चालेल, पण ती मिळावीत ही त्यांची धडपड. कोणी अधिक धान्य पिकवा सांगते, कोणी धान्याची भीक मागत जगभर हात पसरते, कोणी सभासभातून ब्रह्मचर्याची तोड सुचवतात आणि इकडे जीवोत्पादन झपाट्याने होतच आहे.
 अन्नरसाचा क्षीरसागर आटत चालला आहे. अर्धपोटी जिवांचे त्राण नाहीसे होत चालले आहे. भारताच्या असंख्य तोंडात घास भरवील अस कोणाही राष्ट्राचे आज सामर्थ्य नाही. क्षीरसमुद्र आटला की बहुतेक जाव तडफडून मरतील. असंख्य मढ्यांनी खतावलेल्या भूमीवर परत जारात अन्नोत्पादन होईल. अल्प स्वल्प राहिलेल्या जीवांना परत जगण्या- वाढण्याला योग्य परिस्थिती मिळेल व परत नव्याने प्रजोत्पादनाचा प्रया' सुरू होईल.