पान:Paripurti.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२० / परिपूर्ती
 

पण उडिशाच का, सगळ्या भारतात, सर्व प्रांतातून आज अधिकाधिक वाढ कसली होत असेल तर ती माणसांची.
 काही वर्षांपूर्वी एक भिकारीण व तिची तीन मुले लहान मुलांच्या कोर्टापुढे आली होती. मुलांची आई वेडी होती. तिचे आईबाप, भाऊ, नवरा, कोणी आप्तेष्ट चौकशी करून आढळले नाहीत. वेडी म्हणजे चिंध्या चिवडणारी नव्हे... पण अर्धवट. कोर्टामध्ये तिने वारकऱ्याचे अभंग म्हणून कीर्तनकारांच्या शैलीने जीवनाचे असारत्व, पंढरीचे माहात्म्य, संतांचा त्याग व नि:स्पृहपणा ह्यावर आम्हाला चांगलेच प्रवचन दिले. मुले पोसणे तिला शक्यच नव्हते म्हणून सरकारने ती ताब्यात घेतली. चार वर्षांनी पाहते तो परत तीच वेडाबाई एक मूल हाताशी व एक स्तनाशी धरून कोर्टात उभी! गोड हसून तिने मला सांगितले, “तुम्हाला द्यायला आणखी दोन आणली आहेत!"
 वेडी-शहाणी, लुळी-पांगळी, रोगी-निरोगी, गरीब-श्रीमंत सर्वांच्या हातून लोकसंख्येत सारखी भर पडते आहे. तिसाचे चाळीस कोटी झाल, आता ह्या वर्षांच्या शिरगणतीत आणखी कितीची भर पडते म्हणून सर्व जग कुतूहलाने भारताकडे पाहत आहे.
 भारतासारखे काय इतर देश नाहीत का? चीनही अत्यंत दाट वस्तीचा प्रदेश आहे असे ऐकतो. तेथेही लोकसंख्या वाढतच असणार. चीन काय किंवा इतर काही देश काय; लोकसंख्या दाट खरी, पण तिची वाढ भारताइतकी झपाट्याने होत नाही. ह्याचे कारण म्हणजे एका ऐतिहासिक घटनेमळे. जिवाच्या पैदाशीसाठी लागणारी परिस्थिती भारतात गेल्या शतकात जशी निर्माण झाली तशी इतरत्र कोठेही आढळत नाही.
 इंग्रज यावयाच्या आधीचा महाराष्ट्राचाच इतिहास घ्या ना! अठ्ठावन्न सालचे बंड, पेंढाऱ्यांचा उपद्रव, दुर्गादेवीचा दुष्काळ, पानिपतच्या लढाया, निजामाशी लढाया, कर्नाटकातील लढाया, शिवाजी व राजाराम ह्याच्या वेळचे सतत पावशतकाचे स्वातंत्र्ययुद्ध ह्यात सारखी माणसे मरत होती. मूल होण्याच्या वयाच्या तरुण पोरी विधवा होत होत्या. प्रजोत्पत्तीला आळा बसत होता. मराठी इतिहासाचे एक गाढे विद्वान असे सांगतात की, "औरंगजेबाच्या फौजेत असलेले तरुण जवान म्हातारे होऊन दिल्लीला पोचले व सर्व उमेद रणांगणावर गेल्यावर कित्येकांचे निर्वंश झाले असे एका जुन्या बखरकाराने लिहिले आहे." ही परिस्थिती जेत्यांची तर खुद्द ज्यांच्या