वाटतो. दुपारच्या उन्हात तळपताना दृष्टी ठरत नाही, पण ते सुरेख दिसते व
संध्याकाळच्या सावल्या दाटू लागल्या म्हणजे सरोवरावरून हजारोंच्या
थव्यांनी पक्षी उडत काठाशी असलेल्या घरट्यात जातात तेव्हा तर
क्षणाक्षणाला बदलणाऱ्या काळोखणाऱ्या सरोवराच्या काठांवरून हलूच
नयेसे वाटते. पण अधाशीपणे ही दृश्ये पिणाऱ्या डोळ्यांना प्रायश्चित्तही लगेच
मिळते. कोणी नवीन पाहुणे आले ह्या कुतूहलाने खेड्यातील माणसे गोळा
झाली होती. त्यांच्या वाढत्या गलबल्यामुळे लक्ष वेधून मी सरोवराकडची
नजर काढून मागे वळले. वीस-पंचवीस माणसे होती, पण त्यातील फार तर
निम्मी अव्यंग होती. कोणाची बोटे गेलेली, कोणाच्या पायांचे नुसते खुंटच,
कोणाची नाके किंवा कान सडलेले, अशी होती. उडिशाच्या सरकारने
माझ्याबरोबर एक तद्देशीय मदतनीस दिला होता, त्याला मी विचारले, “ह्या
गावात महारोग्यांची वसाहत आहे वाटते?"
“नाही. चिल्का सरोवराच्या भोवतालच्या खेड्यापाड्यांतून
महारोगाचा फार प्रसार आहे."
त्याच्या म्हणण्याचे प्रत्यंतर दोन-चार दिवसांच्या पाहणीत आलेच.
रोग अंगात शिरल्यापासून त्याची लक्षणे शरीरावर दिसायला बारा वर्षे
लागतात म्हणे; पण मला तर कित्येक महारोगी मुले दिसली! मला त्या वेळी
तरी त्यांचे वय बारांपेक्षा कमी वाटले. मग काय गर्भातच त्यांना संसर्ग झाला
होता की, मुले मोठी असूनही वाढ खुंटल्यामुळे लहानखोरी दिसत होती
कोण जाणे! महारोगी नाही असे एकही झोपडे नव्हते. रोगी निरोगी सगळे एके
ठिकाणी राहावयाचे, जेवायचे व झोपायचे. प्रत्येक झोपड्यात पाच-पाच,
दहा-दहा मुले होती. उष्ण हवेमुळे कपड्यालत्त्यांची फारशी जरूर नव्हती.
जमिनीत भाताचे पीक भरपूर येते. सरोवरात बारमास मासे मिळतात.
शेजारच्या जंगलात शिकार व लाकूड मिळते. सृष्टी अनंत हस्तांनी देते आहे,
लोकसंख्या वाढत आहे व त्याबरोबरच रोग्यांची संख्याही वाढते आहे. ह्या
तबकडीत महारोगी किती भराभर वाढू शकतात ह्याचा प्रयोग चालला आहे.
परीला जाताना असेच झाले. प्रत्येक खेड्यापाड्यातून आणि
विशेषतः क्षेत्राचे ठिकाण म्हणून पुरीला इतके लोक हत्तीरोग झालेले पाहिले
की, कधी येथन सुखरूप बाहेर पडते असे झाले. धडापेक्षाही हात व पाय
पाहिले म्हणजे दर वेळी घृणा, भीती व अनुकंपेने मन पिळवटून निघावयाचे.
उडिशाच्या सबंध पूर्वपट्टीत ह्या लोकांच्या पैदाशीची प्रयोगशाळा आहे.
पान:Paripurti.pdf/105
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ११९