पान:Paripurti.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५
एक प्रयोग

 जंतुशास्त्राची ती एक प्रयोगशाळा होती.
निरनिराळ्या जंतूंचे उत्पादन व वाढ कशी व किती
होते ह्याचे प्रयोग तेथे चालले होते. काचेच्या
लहानसहान तबकड्यांतून साखरेचे पाणी, मांसाचा
अर्क, पिठाची कांजी असे निरनिराळे पदार्थ ठेवून
त्यांत सूक्ष्म जंतू घालून काही विशिष्ट उष्णता
असलेल्या जागी ठेवीत. ज्या ज्या जंतुप्रकाराला जे
जे उष्णतामान सर्वांत मानवे तेथे त्यांना ठेवले होते.
जे जे अन्न सर्वांत जास्त मानवे ते ते दिले जाई व
मग अशा परिस्थितीत जंतूंत वाढ किती झपाट्याने
होते त्याचा अभ्यास होई. अन्नरसात ठेवलेला
एखादाच जीव खाऊन खाऊन लठ्ठ होई. त्याच्या
एकपेशीमय शरीराचे दोन तुकडे होऊन दोन नव्या
पेशी- दोन नवे जीव- उत्पन्न होत. काही क्षण
जातात न जातात तो दोहोंचे चार, चारांचे आठ
होत. सूक्ष्मदर्शकातून पाहत बसले म्हणजे
युगक्षयानंतर प्रलयवृद्ध समुद्रावर एकट्या
तरंगणाऱ्या विष्णूप्रमाणे तबकडीतील अफाट
पसरलेल्या क्षीरोदधीवर सुरुवातीला एकच सूक्ष्म
जीव पोहत असतो. तास-दोन तासांत जीवनिर्मिती

इतकी झपाट्याने झालेली असते की, पोहणाऱ्या