पान:Ganitatalya gamatijamati.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

१. गणितातल्या गमती जमती


 सामान्य माणूस गणित ह्या विषयाशी वचकून असतो. हा विषय फार भयंकर, अति क्लिष्ट, आकडेमोडींनी भरलेला... ह्याला दुरूनच नमस्कार केलेला बरा असं त्याला वाटतं. ही धारणा बहुतेक शालेय जीवनात घडणाऱ्या गणिताच्या दर्शनाने निर्माण केली जाते, ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. वास्तविक, गणिताच्या अनेक मनोरंजक पैलूंचे आणि मानवी कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपांचे दर्शन योग्य वेळी घडल्यास ह्या विषयाबद्दल जिव्हाळा आणि आदर निर्माण व्हायला हरकत नाही. गणित हा अवघड विषय आहे हे खरं - पण तो कशामुळे? निव्वळ आकडेमोडीमुळे नव्हे. लांबलचक फॉर्मुल्यामुळे नव्हेच नव्हे ! आधुनिक गणितातले कित्येक कूटप्रश्न दिसायला फार सोपे वाटतात. पण ते सोडविण्यासाठी लागणारा अमूर्त आणि व्यापक दृष्टिकोन मोजक्या संशोधकांतच असतो.

 अशा ह्या आधुनिक गणिताच्या काही मनोरंजक भागाची, त्यातल्या काही कूटप्रश्नांची इथे थोडक्यात ओळख करून देत आहे.

 येथे चित्र क्रमांक १ मध्ये दोन आकृत्या आहेत. या दोन आकृत्यांत साम्य आहे का? दोन्ही आकृतीत समान असा एक तरी गुण आहे का?