पान:Ganitatalya gamatijamati.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
गणितातल्या गमती जमती


गुन्हा केलाच पाहिजे :

 गिल्बर्ट आणि सलिव्हन यांच्या 'रडिगोर' नावाच्या विनोदी ऑपेऱ्यात एका सज्जन पण गुन्हेगार सरदाराची गोष्ट आहे. हा सरदार स्वभावाने सज्जन असूनही रोज एक गुन्हा करतो ! कारण त्याच्या घराण्याला शाप असतो. त्या घराण्यातल्या कर्त्या पुरुषाने रोज एक गुन्हा केला पाहिजे. नाही केला तर त्याला त्या रात्री अत्यंत कष्टमय मरण प्राप्त होईल. ते मरण नको म्हणून मनात नसतानाही त्या सरदाराला रोज गुन्हा करावा लागे.

 पण एका हुशार माणसाने त्याची ह्या पेचप्रसंगातून मुक्तता केली. त्याने सांगितलेला उपाय असा : “जर तू एकही गुन्हा केला नाहीस तर तुला मरण येणार हे नक्की. त्या अर्थी गुन्हा न करणं म्हणजे स्वतःचं मरण ओढवून घेण्यासारखं आहे - म्हणजे हा आत्महत्येचा प्रयल झाला. पण हा प्रयत्न म्हणजेसुद्धा गुन्हा समजला जातो ! तेव्हा तू प्रत्यक्ष काहीही गुन्हा केला नाहीस तरी तुला मरण येणार नाही. कारण स्वस्थ बसूनसुद्धा तू आत्महत्येच्या प्रयलाचा गुन्हा करीत आहेस.”


♦ ♦ ♦