पान:Ganitatalya gamatijamati.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८. ... तर त्याचं घर कुठे होतं ?

 (१) एका गृहस्थाने आपल्या घराभोवती गोल भिंत बांधली आणि त्या भिंतीत बाहेर पाहायला खिडक्या केल्या. पण गंमत अशी की कुठल्याही खिडकीतून बाहेर पाहिलं, की त्याला दक्षिण दिशा दिसे. त्याचं घर कुठे होतं?

 (२) एक गृहस्थ आपल्या घरातून निघून सरळ दिशेने एक मैल चालत गेला. त्याच्या लक्षात आलं की आपण दक्षिणेकडे जात आहोत. मग दिशा बदलून तो मैलभर पश्चिमेकडे गेला आणि परत दिशा बदलून मैलभर उत्तरेकडे चालत आला - तो थेट आपल्या घरीच पोचला ! त्याचं घर कुठे होतं?

 ह्या दोन्ही प्रश्नाचं एकच उत्तर आहे ? त्या गृहस्थाचं घर उत्तर ध्रुवावर होतं.

 ह्यावरून असा ग्रह होण्याचा संभव आहे, की उत्तर ध्रुवात काहीतरी वैशिष्ट्य आहे.

 पृथ्वी बरोबर गोलाकार आहे असं गृहीत धरलं (वस्तुस्थिती तशी नाही ह्या तपशिलाशी आपल्याला इथे कर्तव्य नाही) तर त्यावरील प्रत्येक बिंदू सारखाच. वरील कोड्यात उत्तर ध्रुवाला महत्त्व प्राप्त होतं. कारण आपण उत्तर - दक्षिण वगैरे दिशा ठरवायला उत्तर ध्रुव कोणीकडे आहे ह्याची दखल घेतो. पृथ्वी दोन्ही ध्रुवांना जोडणा-या अक्षाभोवती फिरते,