पान:Ganitatalya gamatijamati.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४. दोन आकड्यांचे गणित

 लेखांक ३ मध्ये दोन आकड्यांच्या गणिताचे उदाहरण विचारले होते. दोन आकडे म्हणजे ० आणि १, त्यांच्या गणिताचे नियम खालीलप्रमाणे असतात.

 ० + ० = ०  ० + १ = १   १ + १ = ०

 त्या गणिताचे एक उदाहरण दिव्याच्या बटनात सापडते. ह्या बटनाच्या दोन स्थिती असतात. दिवा लावलेली (ON) आणि दिवा न लावलेली (OFF) अशी ह्या दोन स्थितींना नावे देऊ, कुठल्याही परिस्थितीत बटन दाबले की फरक होतो; ON चे OFF आणि OFF चे ON परत एकदा दाबले की परिस्थिती पूर्ववत् होते. 'पूर्ववत स्थिती'बद्दल ० आणि ‘बदललेली स्थिती'बद्दल १ हा आकडा वापरला की वरील गणिताचा प्रत्यय येतो.

 व्यवहारात कुठलीही संख्या लिहिण्याकरता आपण ० ते ९ पर्यंत दहा अंक वापरतो. ते का? माणसाला दहा बोटे असतात व मोजण्याच्या सोयी करता दहा हा आकडा वापरात आला असावा. पण ह्याचा अर्थ दहामध्ये असा विशेष काही गुण नाही तो इतर संख्येत नाही. जर आपण ० ते ७ हे आठ आकडे वापरले असते तरी आपल्याला कुठलीही संख्या लिहिता आली असती. उदाहरणार्थ 'आठ' ही संख्या कशी लिहायची? देशांक पद्धतीत आपण जसे ९ नंतरचा आकडा नसल्याने 'दहा' ही संख्या