पान:Gangajal cropped.pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०६ / गंगाजल

कामानिमित्त हिंदुस्थानात यायचे. परत जाताना तिकडे न मिळणाऱ्या कितीतरी गोष्टी मुंबईहून व कलकत्त्याहून आणायचे. मुख्य जिन्नस असत नव्या गाण्यांच्या तबकड्या. ते आले म्हणजे आम्ही दिवसभर त्या तबकड्या लावून गाणी तोंडपाठ करीत असू; आणि मग दिवसभर आम्ही ती गाणी म्हणत असू.' नका टाकून जाउं, डावा डोळा पाण्याने माझा भरला' हे गाणं मी घोळून-घोळून म्हणत होते. आईनं देवघरातून दरडाविलं, “माई, ते गाणं म्हणायचं नाही." मी 'बरं' म्हटलं व थांबले. थोड्या वेळानं आई बाहेर आली व तिनं एक धपाटा लगावला. “सांगितलं होतं ना ते गाणं म्हणायचं नाही!” तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं की, मी पाटीवरील बेरीज वजाबाक्या करिता-करिता अगदी अनवधानानं परत तेच मना केलेलं गाणं म्हणत होते म्हणून. मोठ्या प्रयत्नानं मी ते गाणं मनातून काढून टाकिलं. पण एक प्रश्न उरला होता, ते गाणं का म्हणायचं नाही?' आईला विचारावं, तर ती रागावलेली. प्रश्न तसाच राहिला व पुढे मी विसरूनही गेले. नंतर कितीतरी वर्षांनी मी पुण्यातच दुपारची बसायला म्हणून माहेरी आले होते. रविवार असल्यामुळे सर्व मुलं घरीच होती. गाण्याच्या नव्या-जुन्या सगळ्या तबकड्या लावावयाचा बूट निघाला. मी तिथं गप्पा मारीत बसले होते. गाण्यांकडे विशेष लक्ष नव्हतं, पण एकदम 'नका टाकून जाउं' ही जुनी रेकॉर्ड ऐकू आली. मी ते गाणं जवळजवळ विसरलेच होते. फक्त पहिली ओळ आठवत होती. गप्पा थांबवून मी उत्सुकतेनं पुढं होऊन गाण्याचे शब्द ऐकू लागले. 'नका टाकून जाउं डावा डोळा पाण्याने माझा भरला।तीन दिवस झाले म्हणूनि तंटा हो माझ्याशी केला' वगैरे वगैरे शब्द. सगळ्या शब्दांचे अर्थही लक्षात आले; एवढेच नव्हे, तर आईनं गाण्यास मनाई का केली, अनवधानानं गाणं घोकून म्हणत असता धपाटा का मारिला, हेही उलगडलं. गाणं जुनं झालं होतं. मुलांच्या तोंडी राहिलं नव्हतं. बऱ्याच जणांना जुनंपण नवीन वाटलं. माझ्या लेकीनं मला हलवून विचारिलं, “म्हणजे काय गं?" “अग, काय विचारिते आहेस?" मी आपल्या तंद्रीतून जागी होऊन विचारिलं. “तीन दिवस झाले म्हणुनी तंटा हो माझ्याशी केला' म्हणजे काय ग? आणि डावाच डोळा एकटा कसा ग पाण्यानं भरतो?" तिनं मला कोड्यात टाकलं होतं. “डावाच डोळा पाण्यानं कसा भरतो, हे मला नाही बाई समजत." मी प्रांजळ कबुली दिली. पण तिचा पहिला प्रश्न कायमच होता. “अग, ती बाई तीन दिवस विटाळशी म्हणून त्याला भेटायला गेली