पान:Gangajal cropped.pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०० / गंगाजल

म्हणाली, "माझं तिकीट कुर्ल्याचं आहे. माझ्या नवऱ्याला स्टेशनवर यायला सांगितलं आहे." तिकीट चेकर म्हणाला, "असं मेलेलं माणूस घेऊन तुम्हांला जाता येणार नाही. आता येईल त्या स्टेशनवर म्हणजे कल्याणवर तुम्हांला उतरून देणार" हा सगळा प्रकार पाहून मी रदबदली केली. म्हटलं, “कल्याणपासून कुर्ला किती दूर? जाईना का बिचारी गेली तर!" पण तिकीट चेकर ऐकेना. त्या बाईला तिच्या मेलेल्या मुलासकट त्यानं कल्याणला उतरविलं. बाई एक शब्द बोलली नाही. तिनं कोणाकडे पाहिल नाही. मुकाट्यानं मुलाला खांद्यावर टाकून ती कल्याणला उतरली.

 ती उतरून गेली, आणि माझं विचारचक्र सुरू झालं. भांबुरड्याच्या स्टेशनावर ही माणसं गुपचूप का होती, त्याचं कारण आता मला कळलंस वाटलं. ही पहिलटकरीण तरी होती का? पण तिचं मूल खासच आगगाडीत बसल्यावर आजारी झालं नव्हतं. त्याचा आजार काही दिवसांचा असणार. ते आजारी पडून आता वाचत नाही, असं कळल्यावर त्या लोकांनी तिला व त्याला नवे कपडे घालून त्यांची घाईघाईनं बोळवण केलेली होती. नवऱ्याशी पोहोचेपर्यंत मूल कदाचित जिवंत राहील, अशीही कल्पना असावी. माहेरच्या माणसांनी का सासूसासऱ्यांनी मरायला टेकलेलं मूल मांडीवर देऊन त्याला नव्या कपड्यांनी शृंगारून तिची पाठवणी केली होती. ह्या मुलाला घेऊन काही तासांत ती नवऱ्याकडे पोहोचणार होती. ह्या भयंकर प्रसंगाला तोंड देऊन ती पोरगी बसलेली होती. माझ्या नसत्या उठाठेवीनं तिला मदत तर झाली नाहीच, पण एका भलत्याच स्टेशनावर उतरविल्यामुळे तिच्यापुढे एक नवीनच संकट उभं झालं, हे मला स्पष्ट दिसून आलं. मला मुंबईला बडा रेल्वे-अधिकारी घ्यायला येणार होता. मी सर्व हकीकत त्याला सांगून त्या बाईला कुर्ल्याच्या स्टेशनवर पोहोचवायचीही व्यवस्था केली. पण हे सगळं व्हायला दोनचार तास सहज निघून गेले. आमचा निरोप जाईपर्यंत ती बाई मुलाला घेऊन कल्याण स्टेशनातच बसली होती. असं मला समजलं.

o o

 ह्या गोष्टीला कित्येक वर्षे लोटली. अजून मला त्या पोराची किंकाळी ऐकू येतेसं वाटतं आणि परत परत मनात येतं की, 'मी माझ्या वेड्या कीव येण्यामुळं त्या बाईला व्यर्थ दु:खात टाकलं. ही कीव त्या बाईबद्दल होती, का मला त्या किंकाळ्या ऐकवत नव्हत्या म्हणून स्वत:बद्दल होती, हे समजत