पान:Gangajal cropped.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ९७


एकंदरीने स्वत:च्या कर्तबगारीवर, समाजानं त्याचं हे जे चित्र त्याच्या डोळ्यांपुढं उभं केलं होतं, त्यावर खूष होता.

 एक दिवस संध्याकाळच्या वेळी सेन नदीवरील एक पूल तो ओलांडीत होता. रस्ता जवळ-जवळ निर्मनुष्य होता. अशा कातर वेळी अर्धवट अंधारात एक बाई पुलाच्या मध्यभागी कठड्याला टेकून नदीकडे पाहत उभी राहिलेली त्याला दिसली. अशा वेळेला ती बाई का उभी असावी, असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. बाईची उभी राहण्याची तर्‍हा, काय ओझरतं तोंड त्याला दिसलं ते, यांवरून बाई दुःखीकष्टी असावी, असं वाटत होतं. तिच्या मनात काही भयंकर विचार तर नसेल ना, आपण तिची विचारपूस करावी का, असंही ओझरतं त्याच्या मनात येऊन गेलं. पण आपल्याला काय करायचं, म्हणून तो तसाच पुढे गेला. पुलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचतो. तो त्याला पुलावरूनच एक आर्त किंकाळी ऐकू आली. मागे वळून पाहतो, तो त्या मघाच्या बाईनं कठड्यावरून नदीत उडी घेतली, असं त्याला दिसलं. धावत जाऊन आरडाओरडा करून लोक जमवावे, पोलिसांपर्यंत बातमी पोहोचवावी, शक्य-तो आपणच उडी मारून तिला काढण्याचा प्रयत्न करावा, असंही त्याच्या मनात आलं. पण परत 'जाऊ दे, तिला मरायचं होतं, पाणी पण फार गार असेल,' असं म्हणून तो पुढे सटकला.

 तो पुढे गेला. संध्याकाळी त्याला एका बाईकडे जायचं होतं, तिच्याकडे तो गेला. पण ती हताश बाई व तिची शेवटची किंकाळी त्याला काही विसरता येईना. तिच्या स्थितीची कल्पना आली असूनही तिला तीतून बाहेर काढण्यासाठी आपण काहीही प्रयत्न केला नाही. ही जाणीव त्याला चैन पडू देईना. आपल्या मनातच गरिबांचा कनवाळू असं आपलं जे चित्र त्यानं रंगवलं होतं.त्याच्या पार चिंधड्या झाल्या. त्या किंकाळीची आठवण बुजवण्यासाठी त्यानं आपल्या स्वत:ला दारूत बुडविलं, बायकांच्या उपभोगात स्वतःला विसरण्याचा प्रयत्न केला. जगप्रवास केला. कशानंही ती किंकाळी त्याचा पिच्छा सोडीना. शेवटी एक दिवस तो पॅरिसमधून नाहीसा होऊन, जिथं त्याला कोणी ओळखीचं नव्हतं, अशा हॉलंडमधल्या एका गावी जाऊन तो राहिला. सदैव धुक्यात बुडालेल्या, सदैव एक प्रकारच्या विचित्र थंडीनं भरून राहिलेल्या ह्या गावाचं वातावरण सर्वस्वी पॅरिसच्या विरुद्ध होतं. जणू त्याच्या अंतर्मनाचं प्रतिबिंबच असं कंटाळवाणं, क्षुद्र,