पान:Gangajal cropped.pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ९१


होते. 'आत्मा' एका समाजातील, एका कालातील सुशिक्षित माणसाचे प्रतीक होता. त्यातील 'व्यक्ती' सापडत नव्हती. ते माझ्या मामंजींना विचारीत होते, “अण्णा, तुम्ही आत्मचरित्र का लिहिले?' अण्णांचे उत्तर त्यांच्या स्वभावाला धरून होते. ते म्हणाले, “पुढील लोकांना मार्गदर्शन व्हावे, ही माझी इच्छा," परत मी प्रश्न विचारिला, “चार पाउले उमटवु आपुली ठेवु खुणेचा मार्ग बरा' अशा अर्थाने का?" ते म्हणाले, “होय.” हा हेतू म्हणजे म्हातारपणाची बडबड खासच नाही. कार्य काय, अकार्य काय, चांगले काय, वाईट काय, ह्याबद्दल ज्यांचे विचार पक्के आहेत, कसोटीचा प्रसंग आला असता धीर करून ज्यांनी आपले विचार आचरणात आणिले व ज्याच्या मनात स्वत:बद्दल कधी शंका आली नाही, अशा एका माणसाचे हे उद्गार होते. बेंजामिन फ्रैंकलिनचे आत्मचरित्र असेच असणार. फार काय, अचाट कार्य करणाऱ्या चर्चिलचे आत्मचरित्र, त्याचा तितकाच अचाट शत्रू जो हिटलर त्याचेही आत्मनिवेदन ह्याच त-हेचे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामुळे, कार्याच्या व्याप्तीमुळे व लिहिण्याच्या शैलीमुळे त्यांत फरक आहे, जमीन- अस्मानाचा वाटावा, इतका फरक आहे; पण त्या निवेदनाच्या मागची भूमिका सारखीच. हेही एक प्रकारे आत्मसमर्थनच आहे; पण त्याच्या बुडाशी स्वत:बद्दलची म्हणजे स्वत:च्या कृत्यांच्या, व मतांच्या सर्वथैव योग्यतेची खात्री आहे.

 मी ज्या आत्मनिवेदनाबद्दल बोलते आहे, ते ह्या प्रकारचे नव्हे. ते एक निवेदन असते,-अगदी स्वत:बद्दलचे निवेदन असते. त्याच्या पाठीमागे काही मोठा हेतू नसतो. आपले सांगावेसे वाटते, बोलावेसे वाटते, म्हणून बोललेले असते. त्या बोलण्यात नेहमीच्या बोलण्याप्रमाणेच खूपसे लपविलेले असते; पण बरचसे लपविलेले निसटून बाहेर पडतेच. स्वत:बद्दलचे खूपसे सांगितलेले असते; पण म्हातारपणीच असे का सांगावेसे वाटते?

 सर्वच म्हातारी माणसे खूपच बडबडतात. त्यातली काही साक्षर असतात. साक्षरांतल्या काहींना आपली बडबड कागदावर उतरवायला वेळ असतो. ही बडबड छापून काढणारे काही आढळतात. कारण अशी कागदावर उतरलेली, स्वत:च्या घरच्या नसलेल्या म्हाताऱ्याची वटवट ऐकायला काही रिमाटेकड्या लोकांना वेळ असतो.

 सगळे खरे, पण रिकामा वेळ असला म्हणून तरी स्वत:बद्दल लिहावेसे का वाटावे? तरुणपणी का वाटत नाही? म्हातारपणीच का वाटावे?