पान:Gangajal cropped.pdf/80

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ८७

  रागाने दूर निघून जाणे, रुसून कोप-यात बसणे, जगाला कंटाळून लांब जाणे हे सर्व प्रकार खरे एकटेपणाचे नव्हत. आपली चहा होत नाही, लोकांना आपले अंतरंग समजलेच नाही, असे वाटून मनुष्य जेव्हा रागाने जातो, तेव्हा मनाच्या कुठच्यातरी कोप-यात जगाच्या निकटपणाची जाणीव त्याला असतेच. जगाने माझी आज उपेक्षा केली, तरी उद्या त्याला माझी किंमत कळेल, ह्या गावी माझी बूज राहिली नाही, तरी कुठेतरी दुसरीकडे माझ्या भावनेला खासच साद मिळेल, अशी त्याची खात्री असते. ह्या एकान्तवासाची सर्व भूमिकाच लोकसापेक्ष असते. लोकांपासून तोंड वळविले, तरी पशुपक्षी, झाडे ह्यांच्या सहवासात संतकवी परमेश्वरचिंतन करीत होते असे दिसते. म्हणजे- जरी कोणी रुसले, रागावले, एकान्तवासात गेले, तरी एकटे नसते.

 मला जे एकटेपणाचे ज्ञान झाले, त्यामुळे मी इतकी भांबावून, गडबडून गेले, तो अगदी खराखुरा, अनादि-अनंत असा एकटेपणा आहे. तो माझाच नव्हे, सर्व जीवजातीचा, ज्यात-ज्यात म्हणून चैतन्य आहे, त्याचा एकटेपणा आहे. आपल्या भोवती जी माणसे आहेत, त्यांना आपण कधी भेटलोच नाही, अशा भेटीची शक्यताच नाही; डोळा डोळ्याला भिडतो, काहीतरी मिळालेसे वाटते. पण ती खरी मिळणीच नाही; स्पर्शाची तीव्र अनुभूती ही भेट नव्हे. एखाद्याचा पायरव कानी पडावा, त्याचे शब्द कानी यावे, पण हे सर्व भेटीचे प्रसंग म्हणजे समुद्रात सहजगत्या प्रवाहाने एकत्र येणारी लाकडे जशी एकमेकांना टक्कर देतात, त्यापेक्षा विशेष असे काही नाही. शेवटचा उपाय म्हणून देवाच्या पायांवर डोके ठेविले. मंदिराच्या दाराशी जरा बसले, तेथेही मनात हाच विचार आला, ‘अठ्ठावीस युगे ह्या क्षणाची वाट पाहत तू उभा असणार, जन्म-जन्मांतरीच्या फे-यांत मी चुकून तुझ्या पायांवर येऊन आदळले ही काय भेट म्हणायची? एक आत्मा, दुस-या आत्म्याला भेटणेच शक्य नाही.

 ह्या परिस्थितीला आल्यावर आपण शेवट गाठला, ह्यापलीकडे जाणे शक्य नाही, असे वाटले. माझ्या समजुतीप्रमाणे मी स्वस्थ होते; पण मला न सांगता, न सवरता मन ह्या कोंडीतून सुटण्याचा प्रयत्न करीतच होते. आता पुढे मार्ग नाही, ही कबुली द्यायला मन तयार नसतेच..

 नेहमीच्या वाचनातील ओळी व शब्द निराळ्याच संदर्भात मनापुढे यायला लागतात. शब्द तेच, प्रत्येक शब्दाचा अर्थ तोच, पण मनाच्या