पान:Gangajal cropped.pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



गंगाजल / ७३

 'तुझ्या जिवंत राहण्यामुळे होणाच्या कल्याण-परंपरेचे जतन कर व इन्द्रपदाहून काकणभरही वैभवाने कमी नसलेल्या राज्याचा उपभोग घे.'

 हा व्यवहारिक उपदेश राजाने मानिला नाही. त्याने सिंहाला उत्तर दिले; सिंहाचा अनुनय केला.

 'क्षतापासून रक्षण करतो तो 'क्षत्रिय' समजतात. मी जर ते केले नाही, व कोणाचा तळतळाट घेऊन आपला जीव वाचविला, तर ते योग्य होईल का?'

 'ही अशी-तशी साधी गाय नाही. प्रत्यक्ष कामधेनूची ती मुलगी आहे. तेव्हा मला खा, आणि हिला सोड. तुझा उपवास फिटेल. गुरूंचेही हित साधेल'

 'तूही चाकर आहेस. तुझ्यावर नेमलेले काम तू महायत्नाने करितो आहेस. मग माझ्यावर सोपविलेले काम न करिता मी आपल्या नियोजकापुढे कसा उभा राहू?'

 क्षणभंगुर नाशवंत शरीराविषयी मला आस्था वाटत नाही. मला काळजी आहे ती माझ्या यशाबद्दल. ते यशोरूपी शरीर राखण्यासाठी तू मला मदत कर.'

 ह्या इथे रानात आपण भेटलो, एकमेकांशी बोललो, त्यामुळे आपला मित्रसंबंध जडला आहे. आता, हे भूतनाथानुचरा, माझी एवढी प्रेमाची विनंती ऐक, गायीला सोड व मला खा.'

 आपण जीव तोडून सांगितले, तरी राजा ‘मरून कीर्तिरूपे उरण्या'च गोष्टी बोलतो आहे, हे ऐकून सिंहाला नवलच वाटले. 'जिवंत राहून कल्याणपरंपरा जतन करण्याऐवजी कीर्तीच्या हावेने केवढी अनर्थ परंपरा हा राजा ओढवून घेणार आहे, हे त्याला कसे कळत नाही? राजा निपुत्रिक मेला, तर केवढे अराजक माजेल, हे त्याला कळत नाही का?' वगैरे विचार सिंहाच्या मनात आले असणार, ‘पण जाऊ दे, आपल्याला काय करावयाचे? हा स्वप्नाळू माणूस म्हणतो आहे तसे करावे,' असा सिंहाने विचार केला.

 भोळ्या सिंहाने गायीला सोडले. राजावर देवांनी पुष्पवृष्टी केली व तोही सुटला. राजावर ऋषी प्रसन्न झाले. गाय प्रसन्न झाली व त्यांच्या प्रसादाने त्याला मुलगा झाला, वगैरे पुढचा कथाभाग कालिदासाने सांगितला आहे. पण त्या बिचार्‍या सिंहाबद्दल एक शब्दही नाही. ही सर्व