पान:Gangajal cropped.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एके ठिकाणी एक नवी वस्ती घडत होती.वसाहतीच्या एका अंगाला काही न बांधलेली अशी एक मोकळी जागा शिल्लक होती; एक दिवस तेथेही पाया खणला गेला. बाकीच्या घरांसारखा तो दिसला नाही. पाहता-पाहता एक लहानसे देऊळ उभे राहिले.

 ह्या नव्या वस्तीला देऊळ!

 "एक तमीळ म्हण आठवली." मी ती म्हण परत म्हणून दाखविली, आणि तिचे शब्दश: भाषांतर केले, देवळाविना गावात घर असू नये: “कोण जुन्या काळचा मनुष्य होता कोण जाणे! पण त्याला वाटले की, ज्या गावात देऊळ नाही, तिथे आपली धडगत नाही. ज्या जुन्या काळी ही म्हण झाली असेल, त्या वेळीतरी देवाळाशिवाय गाव असण्याची शक्यता नव्हती.

 "देऊळ हे एक श्रद्धास्थान आहे.आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे.ज्या गावात ते नसेल, ते एक श्रद्धा नसलेले, कोठच्याही त-हेच्या सामुदायिक आकांक्षा नसलेले ठिकाण असते. म्हणून तेथे राहू नये, असे भाष्य या म्हणीवर करावे लागेल."

 "देवळामध्ये अरूपाला रूप दिलेले असते.अनादीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते; प्रसंगी अनंताचे विसर्जनही करितात. आपण जे नाही, पण ज्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे, असे काहीतरी सत म्हणून आहे.आपल्या आर्ततेत त्या सतला आपण निरनिराळे रूप देतो; तोच देव"