पान:Gangajal cropped.pdf/53

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 ५६ / गंगाजल


नरभक्षक असतात ना,
ते पुरुषच नाही खात
बायकांनासुद्धा खातात.
नरभक्षक फक्त पशूच नसतात
माणसेसुद्धा असतात.
ते लहान असतात, मोठे असतात,
तरुण असतात, म्हातारे असतात.
ते एकएकटे नाही शिकार करीत
टोळी करून हेरतात
तुटून पडतात
फाडून खातात
ढेकर दिली की परत हेरू लागतात,
आता कोणाला बरं घेरावं?
बाहेरचं कोणी सुचलं नाही
तर डोळे चुकवीत एकमेकांकडे पाहतात,
कोण बरं गाफील आहे?
कोण बरं सावध नाही?
सावध डोळे एकमेकांना भेटतात,
कोण गाफील ते सांगतात
मिळाली शिकार! मिळाली शिकार!