पान:Gangajal cropped.pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
गंगाजल / ४९

पाहाते आहे, हे पाहून ती थेट माझ्याकडे आली व मला आपल्या हातातलं ती काढीत असलेलं चित्र दाखवीत म्हणाली, “छान आहे नाही?" तिच्या रेघोट्या पाहून मी म्हटलं, “छान आहे. कसलं आहे?" “एवढंसुद्धा कळत नाही का?" असं म्हणून स्वारी माझ्या मांडीवर चढली व ते चित्र कसलं आहे, हे समजावून देऊ लागली. तिचा लाघवीपणा, धीटपणा, गोडपणा ह्यांनी मी अगदी जिंकले गेले होते. एवढ्यात आजी आत आली. तिच्या तोंडावर आश्चर्य व थोडी भीती होती. “आजी, कोणाची ग ही? किती गोड आहे नाही?" एवढा वेळपर्यंत तिचा एक हात माझ्या मानेभोवती पडला होता. आजी उद्गारली, “तुझ्या आईची धाकटी मुलगी आहे ती. आईसारखीच दिसते." ओळखीची का वाटली, ते कळलं. ती व मी दिसायला सारख्या होतो. बिंब-प्रतिबिंब एक झालं. माझी आई, हरवलेली आई मला सापडली!

१९७०