पान:Gangajal cropped.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ४४ / गंगाजल

आठवणीनं भरलेला होता. मामंजी जाऊन इतकी वर्ष झाली, पण एका खोलीला मुलं अजूनही 'आजोबांची खोली' म्हणतात. ताई सासरी गेली. तिची मुलगी कॉलेजात जायची वेळ आली, तरी त्या घरातील एक खोली ‘ताईची खोली' म्हणून राहिली आहे. स्वयंपाकघर व कोठी आईनं दर वेळी लावायची. सासूबाई कधी मधी येत, पण आठवण मागे ठेवून जात. त्या घरी माझीच नाही, पण इतरही मुलं वाढली होती. प्रत्येकजण काहीतरी आठवण ठेवून गेलं होतं. खालच्या जमिनीपासून वरच्या छातापर्यंत घर आठवणींनी कसं गच्च भरलं होतं. बाहेर अंगणात यावं, तरी तोच प्रकार. प्रत्येक झाडाचा खड्डा कधी खणला, व झाड कुठून आणून कधी लावलं, ते माहीत होतं. गुलाबाची बाग नाहीशी झाली होती, पण आमच्या बोलण्यात व मनात तीअजून ताजी टवटवीत होती.

 एक वेळ अशी आली की, त्या घरात मला कोंडून बांधल्यासारखं वाटायला लागलं. सगळीकडून मला काहीतरी दडपून टाकीत आहे, असा भार माझ्यावर पडला होता. भूतकाळ माझी मान दाबून राहिला होता. त्यानं माझे हात-पाय-मन जखडलं होतं. तो मला खुलेपणानं, मोकळेपणानं वावरू देत नव्हता. नुसतं घर आणि अंगण झपाटलेलं होतं असं नाही, तर सर्व परिसरच झपाटलेला होता. शेजारी मैलभरात सर्व माणसं ओळखीची. एरव्ही जी दोन हात दूर, तीही आजारीपणामुळे भेटायला यायची आणि डोकं खायची. कोणीही रस्त्यावरून जाता-जाता डोकावावं व विचारावं, "ठीक आहे ना?" सगळ्यांनाच फार आपुलकी. सर्व काही-माझ्याखेरीज - पूर्वीसारखं. मी मात्र पार बदलले होते. ही आपुलीक माझा जीव घाबरा करीत होती. चांगुलपणानं मी कासावीस झाले होते. त्या आठवणी व ती आपुलकी ह्यातून सुटण्यासाठी तर इतक्या वर्षांचं घर सोडून मी नवं घर मांडलं होतं.

 नव्या घराच्या आसपास कोणी ओळखीचं नव्हतं. दिवसादिवसांत कोणी घरी डोकावलं नाही. भेटायला लांब असलं, तरी अधूनमधून आपली माणसं एकेकदा तरी येऊन गेली. फक्त तीच आली नाही. आज पडल्या- पडल्या मी तोच विचार करीत होते. तिचा फोटो समोरच भिंतीवर होता. मी विचारलं, “बये, येत का नाहीस? मला विसरलीस का?" ती काय उत्तर देणार? पण तिचे डोळे मला विसरल्यासारखे दिसत नव्हते.

 जुन्या घरी काही काम निघालं. मला तिकडे दोन दिवस रहावं लागणार होतं. ठरल्याप्रमाणे मी गेले. माझ्या पूर्वीच्याच अंगणाशेजारच्या खोलीत