पान:Gangajal cropped.pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३४ / गंगाजल


आणि गणित हे विषय घेतलेले होते आणि ह्या दोहोतही तिची बुद्धी फार छान चाले. अप्पांना ती मुलाच्या जागी. लहानपणापासून नाना त-हानी अप्पांनी तिचे लाडही केले होते, व शिस्तीत शिक्षणही केले होते. आपल्याप्रमाणेच तिने केंब्रिजला जावे, तेथे गणिताच्या परिक्षेत असामान्य यश मिळवावे, अशी त्यांची फार इच्छा होती. पण ह्या मुलीने इंटरमध्ये असतानाच आपले लग्न ठरविले. ज्याच्याशी ठरविले, तो मुलगा मध्यम स्थितीतील खाऊन-पिऊन सुखी अशा घराण्यातील, पण अतिशय हुशार नव्हे. मुलाच्या घरच्या परिस्थितीपेक्षाही शकूने लग्न ठरवावे व आपल्या भावी बौद्धिक जीवनाला हरताळ फासावा, ह्याचे त्यांना वाईट वाटले. पण त्यांच्या नेहमीच्या सरळ स्वभावामुळे व सुधारकी तत्वांना धरून त्यांनी त्या लग्नाला मोडता घातला नाही. हे लग्न काही दिवसांत शकूनेच मोडले. मोडून शकू परत अभ्यास करण्यास मोकळी झाली ह्याबद्दल अप्पाना आनंदच झाला असला पाहिजे. हा आनंद काही त्यांनी बाहेर दर्शविला नाही; तरी तिला विलायतेला पाठविण्याची सर्व तयारी केली आणि बी.एससी.त पहिल्या वर्गांत येऊन शकू विलायतेला गेली. पण अप्पांच्या मनाप्रमाणे गणितात मोठे यश संपादन न करिता फ्रेंच, शिक्षणाची तत्वे वगैरे इतरच विषयांवर लक्ष केंद्रित करून जेमतेम ती परीक्षा पास झाली. अप्पा विलायतेहून आल्यानंतर तिने त्यांच्या मनाविरुद्ध तिकडेच लग्न केले. काही वर्षांनी शकू परत आली व शकूची मुलगी सई जन्मापासूनच आप्पांकडेच वाढली.

 ह्या सर्व गोष्टींचा अन्वयार्थ अप्पांनी काही लावला असेल, ह्याचा सुगावा मला नुकताच लागला. ती कथा अशी : सई अतिशय गोड पोरगी. अभ्यासात शकूइतकी हुशार नाही, पण लहानपणापासूनच निरनिराळया कला ती चटदिशी आत्मसात करी. ती कशीबशी बी.ए. पास झाली. पण तोपर्यंत शकूच्या प्रोत्साहनाने म्हणा, किंवा शकू मागे लागल्यामुळे म्हणा, तिने काही चित्रे काढली, काही गोष्टी व काही लहान नाटके लिहिली. सई म्हणजे कमालीची आळशी व सुखासीन. एखादी कल्पना आली, म्हणून मांड घालून लिहायला बसली, किंवा मानेवर खडा ठेवून आपण होऊन तिने चित्र काढिले, असे कधी व्हायचे नाही. सईला बसवायचे नि तिच्याकडून काम करून घ्यायचे, हा उद्योग शकूचा. एकदा मी एम.ए.चा वर्ग.शिकवून येताना मला सई भेटली. मी तिला जरा आश्चर्यानेच विचारिले. "बाई, तू इकडे कुठे