पान:Gangajal cropped.pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / २९


अशांसारखी वर्मी लागणारी लिखाणे 'केसरी'त प्रसिद्ध झाली, तरी त्याबद्दलची बातमी आम्हांला बाहेरून लागायची. हे घरात आपले नेहमीसारखेच. अशा सरळ ध्येयवादी माणसाविरुद्ध त्याच गावातला दुसरा मनुष्य असे कसे लिहू शके, ह्याचे मला अजूनही आश्चर्य वाटते. एकदा प्रतिस्पर्धी म्हटला, म्हणजे तो राज्यकर्ता इंग्रज आहे, की कुटिल दुष्टबुद्धी मनुष्य आहे, की केवळ आपल्याहून निराळी मते धारण करणारा एखादा सज्जन आहे, ह्याबद्दलचा काहीही विवेक न करिता त्याला नामोहरम करायचे, ही पुण्याची बरीच जुनी परंपरा आहे. तीतलाच हा प्रकार. एवढे खरे की, अप्पांच्यावर असल्या टीकेचा काहीच परिणाम होत नसे; आणि घराचे वातावरण ह्या दिवसापासून त्या दिवसापर्यंत कधी बदलत नसे. बाहेर काहीही टीका झाली असली, सहकाऱ्यांशी सभेत कितीही कटकटी झाल्या असल्या, तरी नाट्यवाचनाचा दिवस आमचा एकदा ठरला, म्हणजे त्यात खंड पडत नसे. ह्या प्रकारामुळे ते प्रिन्सिपॉलकी संपवून मिनिस्टर झाले, तरी ते बाहेर काय करतात, ह्याची आम्हांला- निदान मला तरी- बिलकुल दाद नव्हती. आमच्या मते ते मिनिस्टर झाले ह्याचा अर्थ एवढाच की, आम्ही मुंबईला मोठ्या बंगल्यात रहायला गेलो, महाबळेश्वरला महिनेच्या-महिने त्यांच्या बंगल्यात राहिलो, भटक-भटक भटकलो, आणि स्ट्रॉबेरींवर दुधाची दाट साय घालून त्या खाल्या!

 अप्पा सईताईंच्या कधी जवळ आले नाहीत. त्यांच्या नातेवाइकांच्या परिवारातही त्यांनी कधी आपले अंत:करण उघडे केले नाही. शकू त्यांना सगळ्यांत जवळची. ती स्वतः आयुष्यात बऱ्याच प्रसंगांतून गेलेली. पण त्याबद्दल कधी बापलेकींत मोकळी चर्चा झाली असेल, असे वाटत नाही. एक अशी व्यक्ती होती की, तिच्या जवळ अप्पा आपले खाजगी व सार्वजनिक आयुष्य ह्याबद्दल चर्चा करीत असत. ती व्यक्ती म्हणजे सेंट जॉन कॉलेजमध्ये ज्यांच्याशी अप्पांची मैत्री झाली, ते श्रीयुत बालकराम. बालकरामांच्या मनाची घडण कितीतरी जास्त गुंतागुंतीची, भावनाप्रधान व हळवी अशी होती. आणि अप्पा व ते एकमेकांना पूरक असावे, असे वाटते. ते पुण्याला येत, तेव्हा घरात सगळ्यांनाच उत्साह वाटे. अप्पांचे नि त्यांचे पुष्कळ वेळ बोलणे चाले. अप्पाही त्यांच्याकडे कधीमधी रहायला जात असत. ते दुर्दैवाने तीस-बत्तीस वर्षांपूर्वी वारले. तेव्हापासून बरोबरीचे, जिवलग असे मनुष्य अप्पांना नाहीसे झाले. एखादे वेळेला, एखादे वाक्य