पान:Gangajal cropped.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 २२ / गंगाजल

एक आठवण नव्याने सांगितली. ती शाळेतला इंग्रजीचा धडा अप्पांच्या समोर वाचीत होती. अप्पांनी तिला एका शब्दाचा अर्थ विचारिला. तो तिला काही आला नाही. मी असते, तर मुकाट्याने अप्पांचे बोलणे ऐकून घेतले असते. पण शकू कसली खट! त्यांना म्हणाली वाटते, “तुमच्या इरावतीला विचारा. तिलासुद्धा माहीत नाही ह्या शब्दाचा अर्थ! अप्पांनी मला बोलाविले, आणि त्या शब्दाचा अर्थ विचारला. माझ्या सुदैवाने मी तो धडा करिताना तो शब्द डिक्शनरीत पाहून ठेविला होता व तो मला माहीत होता. अर्थात मी तो बरोबर सांगितला. शब्दाचा अर्थ माहीत नाही म्हणून व वर तोंड करून बोलली म्हणून आणखी अशा दुहेरी अपराधाबद्दल शकूला चांगला चोप बसला. शकुला चोपणे हेच मला वाटते त्यांच्या तिच्यावरल्या मायेचे चिन्ह होते. आजतागायत त्यांची ही वृत्ती कायम आहे. त्यांची नात सई चित्रे छान काढिते, नाटके लिहिते, नाटकात स्वत: काम करिते. पण कधी एका शब्दाने तिला शाबासकी देतील तर शपथ. परवा मजजवळ म्हणाले, “सईचं आजचं नाटक छान झालं होतं नाही? तेव्हा मी म्हटले "अप्पा, पोरीजवळ का नाही मग तसं म्हणत? तर मला म्हणतात, "उगीच स्तुती केली तर शेफारून जाईल! आपलं न बोललेलच बरं."

 अप्पा जरी काव्याचे भोक्ते नाहीत, तरी एका ठराविक कालखंडा पर्यंतच्या इंग्रजी वाङमयाचे अगदी एकनिष्ठ भक्त आहेत. भाषांतरित फ्रेंच वाङमय त्यांनी वाचलेले आहे व काही आम्हा मुलींकडून वाचूनही घेतले आहे. पण इंग्रजी वाङमयाशी त्यांचा संबंध अगदी जिव्हाळ्याचा आहे. नुसत्या कादंब-याच त्यांनी आमच्याकडून वाचून घेतल्या असे नव्हे, तर शेरिडन, गोल्डस्मिथ थोड्या प्रमाणात शेक्सपियर ह्यांची नाटकेही वाचुन घेतली.

 जेन ऑस्टेनच्या बाबतीत तर त्यांची भक्ती पराकोटीची आहे. जेन ऑस्टेनच्या निरनिराळ्या कादंब-यांतील माणसे पुस्तकातच न राहता आमच्या घरी जणू नित्य वावरत असत. आयुष्यात प्रत्येकजण आपल्या मताने आपली स्वत:ची अशी एक भूमिका वठवीत असतो. एका मनुष्याच्या भूमिका सदैव व सर्वत्र एकच असत नाही. घरी, कचेरीत, मित्रमंडळींच्या घोळक्यात, क्रीडांगणावर मनुष्य आपापल्या मताप्रमाणे काही विशिष्ट कल्पना मनात ठेवून त्या आचरीत असतो. अप्पांनी घरामध्ये तरी निदान जेन ऑस्टेनच्या ‘प्राइड अँड प्रेज्युडिस'मधील मिस्टर बेनेटची भूमिका वठवायचे