पान:Gangajal cropped.pdf/143

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 १५० / गंगाजल

शेजारी एखादी जिवंत तरुणी मारून पुरलेली असावी. स्त्रीजात गरजेनुसार वापरायची. स्त्री म्हणजे केवळ कातडीची थैली. पुरुष हा पुत्ररूपाने पुन्हा जन्मतच असतो. मूल पित्याचे, आई फक्त साधन, असे सांगणारी भारतीय सांस्कृतिक परंपरा कितीही यातनामय असली, तरी ती इरावतींना जवळची होती. कारण ती त्यांची स्वत:ची परंपरा होती.

 चौफेर उपस्थित असलेल्या या दु:खाच्या अस्तित्वाने बाई सदैव घेरलेल्या आहेत. मध्येच कुठेतरी मारी-कुट्टीसारखी एखादी कुरूप स्त्री असते. तिच्या केसाच्या मळसूत्राकार गुंडाळीत थकवा येईपर्यंत उवा फिरत असतात. वेड्यांच्या दवाखान्यात ती परिचारिका म्हणून असते. वास्तविक जग विसरून जे मिळविता आले नाही, ते मिळाल्याच्या भ्रांतीत वेडे वावरत असतात; आणि असेच एक खोटे स्वप्नसाम्राज्य निर्माण करून मारी-कुट्टी आपल्या अर्थशून्य जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करीत असते. कुठे देवळांच्या भोवताली पसरलेले निरनिराळ्या रोगांचे जंगल असते. कुठे ही दु:खे सांस्कृतिक रूप धारण करतात; आणि त्यांचे स्वरूप सांस्कृतिक कारणांमुळे अधिक उत्कट व्हायला लागते. मुले मोठी होतात; आणि मग त्यांना स्वत:च्या जीवनाची गती लागते. म्हातार्‍या माणसांना एकाएकी आठवण येते की, आता आपली गरज संपलेली आहे. गरज संपल्यानंतरही टिकून राहण्याचा केविलवाणा अट्टाहास कमी यातनांना जन्म देत नाही! तर कुठे मानवी प्रयत्नांची सगळी व्यर्थताच समोर दिसू लागते. किंकाळी फोडणार्‍या मुलाच्या मदतीला आपण गेलो, हेही व्यर्थच. असे मदतीला आपण गेलो नसतो, तर तेही व्यर्थच! समाजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करून आपला एकटेपणा विझविला, तरी तोही प्रयत्न व्यर्थ ठरतो, आणि आपल्या एकाकीपणात रमावयाचे असे म्हटले, तर ते रमणेही व्यर्थ ठरते. अशा प्रकारच्या नानाविध दु:खांनी, मृत्यूच्या व भीतीच्या जाणिवांनी, निसर्गात मूलभूत असणारे क्रौर्य आणि त्या क्रौर्याच्या प्रतिकारार्थ नेहमी- नेहमी लुळी पडणारी संस्कृती, अशा जाणिवांनी इरावतींचे अस्तित्व घेरलेले आहे.

 या दु:खांकडे पाहताना इरावतींनी मरणाची अपरिहार्यता स्वीकारलेली आहे. शरीराच्या आणि मनाच्या वाढीबरोबर येणारी माणसांची ताटातूट हीही एक अटळ घटना म्हणून मान्य केली आहे. सांस्कृतिक दु:खाचा अटळपणातर इरावतींना मान्य करणे भागच होते. कारण त्या व्यथेच्या