पान:Gangajal cropped.pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



गंगाजल / १४९

लावून केवळ मनाची समृद्धी वाढवू नये, तर विचारांना एक दिशा द्यावी, अशी अपेक्षा असते. इरावती जर समोर दिसणारे अनुभव नाकारून पुढे गेल्या असत्या, तर आपल्या मर्यादित वर्तुळात एखादी संगती त्यांना शोधताही आली असती. पण समोर दिसणारे दाहक सत्य नाकारणे त्यांच्या स्वभावात नव्हते, आणि हे सत्य जर स्वीकारायचे असेल, तर त्या संदर्भात विचारांचे शेवटचे टोक गाठले पाहिजे, अशी त्यांची तयारी नव्हती. कदाचित याचे कारण हेही असेल की, भारतीय स्त्रीच्या उपजत मनाप्रमाणे त्यांनी दु:खांची अपरिहार्यता स्वीकारलेली होती. प्राकृतिक दु:खे, सांस्कृतिक दु:खे आणि सामाजिक दु:खे हा सर्व यातनांचा भोग माणसाला अपरिहार्य आहे, याची जाणीव अगदी तरुणपणापासून त्यांच्या मनात वावरत असताना दिसते. बिहारमध्ये आपल्या कामानिमित्ताने फिरताना त्यांना आढळून आले की, गंगेच्या सुपीक खोर्‍यात चार भिंतींच्या कोंडवाड्यात बायका केवळ स्वयंपाक करून, यजमानांची वाटच पाहत बसतात. मुलीने विचारले, "जन्मभर असे वाट पाहत कुजतच बसायचे काय?" बाईंनी भारतीय स्त्रीच्या दु:ख अपरिहार्य मानणाच्या थंड मनाने उत्तर दिले, “नाही, त्यांना फार वेळ कुजत बसावे लागत नाही. आजार त्यापूर्वीच त्यांनी सुटका करतात."

 दु:ख टाळण्याकडे आणि ते टाळल्यानंतर डोळे झाकून घेऊन स्वप्नात रमण्याकडे बाईंची कधी प्रवृत्ती नव्हती. जी दु:खे आहेत, ती आहेत, ती नाहीत म्हणून चालणार नाही, याचीही त्यांना जाणीव होती आणि ही दु:खे कधी संपणारी नाहीत, याचीही त्यांना जाणीव होती. एकेक अनुभव त्यांना थेट दु:खाच्या गाभ्याजवळ घेऊन जात असे. या दु:खाच्या गाभ्याजवळ आपण पशुंच्या कितीतरी जवळ आहोत, अशी त्यांना अचानक आठवण येई. वारक-यांच्या तांड्याबरोबर हरिनामाचा गजर करीत जातानासुद्धा अचानकच कुठेतरी न टळणारे दु:ख एखाद्या म्हातारीचे रूप घेऊन त्याच्यासमोर उभे राही. सहजगत्या एखाद्या वृद्धेला नातवंडांच्याविषयी प्रश्न विचारावा, तर तिचे डोळे मिटत, तोंड भेसूर दिसू लागे. सारे शरीर भीतीने थरथरत असे. कुत्रीच्या पिलाला जेव्हा जनावर चावले, तेव्हा तीही अशीच भीतीने थरथरत होती, याची आठवण हे मानवी दु:ख पाहताना बाईंना येते. कुठे उत्खननासाठी जावे, तो एखादा युद्धात मारलेल्या माणसाचा सांगाडा सापडत असे, आणि मग अचानक अशी हुरहूर लागायची की, याच्या