पान:Gangajal cropped.pdf/141

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४८ / गंगाजल


देशातील जो फुटीरपणा जोपासला जात आहे, तो कार्यक्रम मात्र त्यांना मान्य नव्हता. शिक्षणाच्या वाढीमुळे भ्रमनिरास झालेले सुशिक्षित तरुण वाढतात, हे त्यांना दिसत होते. शिक्षण मनाचा सुसंस्कृतपणा वाढविण्याला असमर्थ ठरले आहे, तसेच ते सुखाच्या वाढीलाही उपयोगी ठरत नाही, हेही त्यांना दिसत होते. पण समाजाला काही मूलभूत परिवर्तनाची गरज आहे, असे मात्र त्यांना कधी जाणवत नव्हते. प्राचीन संस्कृतीविषयीची ओढ, भिन्नभिन्न प्रकारच्या समाजांचा अभ्यास यांमुळे बाई उदारमतवादाच्या मर्यादांपर्यंत येऊन पोहोचल्या होत्या. पण त्या मर्यादा ओलांडण्याला त्यांचे मन जणू धजावत नव्हते. उदारमतवादच व्यक्तिस्वातंत्र्य टिकवीत नसतो. एकाच समाजात एकाच वेळी नांदणारी हट्टी, संघर्षमय तत्वज्ञाने परस्परांशी संघर्ष करतानाही व्यक्तिस्वातंत्र्यच टिकवीत असतात, असे बाईंना कधी वाटले नाही. त्यांच्याजवळ आईची करुणा होती; पण त्यांचे सश्रद्ध मन मुळातच उलथापालथ करण्याला धजत नव्हते. इतकाच याचा अर्थ.

 याचा परिणाम असा झाला आहे की, इरावतीबाई एकीकडे दारिद्य, उदध्वस्तता, रोग, विद्रूपपणा आणि दुसरीकडे समृद्धी, विविधता टिपीत चालल्या आहेत; मधूनमधून भय, भीतीच्या जाणिवाही आहेत; मृत्यूचे स्मरण आहे; पण त्याबरोबरच सहस्त्र पिढ्यांचा अनुबंध आहे. म्हणून बाईंना सगळेच हवेसे वाटते. त्या आग्रहाने कशाच्या विरुद्ध उभ्या राहू शकत नाहीत. मनाच्या या घडणीमुळे त्यांच्या लिखाणाची विविधता वाढली आहे. पण हे लिखाण काहूर आणि करुणा यांच्या काठांवर थांबणारे आहे; पलीकडच्या काठावर जाण्याची प्रेरणा देणारे नाही. कारण ते कशाच्याचविषयी चीड निर्माण करू शकत नाही. सामाजिक चिंतनात विरोधकांचे सामर्थ्य आणि महत्व जाणणे यालाही महत्व आहे. पण स्वत:च्या आग्रहांनाही काही महत्व आहेच आहे. उदारमतवाद अशा प्रकारची काठापर्यंत जाणारी चिरफाड करू शकत नसतो. फुटू पाहणारे कुटुंब सावरून धरण्याची धडपड करणाऱ्या म्हाताऱ्याप्रमाणे उदारमत-वादाची अवस्था असते.

 ललितवाङमयाचे स्वरूप प्रेरक असलेच पाहिजे, असा आग्रह धरण्याचे कारण नाही, हे मलाही समजते. पण ज्या वेळी एखाद्या चिंतनशील मनाच्या सहवासात आपण येतो, त्या वेळी या चिंतनशील मनाने नुसता मनाचा समजूतदारपणा वाढवू नये. भिन्नभिन्न प्रकारे अनुभव घेण्याची सवय