पान:Gangajal cropped.pdf/138

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


गंगाजल / 145

आविष्कार यांत मूलत:च फरक असतो. अनुभव घेत असताना त्या अनुभवांची संगती लावणे आणि भाष्पनिरूपणांसह सर्व अनुभव पुन्हा अनुभवाच्याच पातळीवर शिल्लक राहणे, ही प्रक्रिया म्हणजे चिंतनशील मनाचा एक धर्म असतो. चिंतनशील मन हे प्रत्येक घटनेवर निरूपण करीतच असते, त्याची संगती लावीत असते. त्या ठिकाणी असणारा विचार नेहमीच सर्वस्वी नवा असतो असे नाही, पण तो अनुभवाचा भाग असतो. आणि ज्या वेळी पूर्वसिद्ध विचार सजवून मांडिलेले असतात, त्या वेळी विचारांना सोयीस्कर होतील असे प्रसंग हुडकून एकत्र आणिलेले असतात. सजावटीसाठी सावडून आणलेल्या सामग्रीलाही अनुभवाच्या पातळीवर जिवंत होता येणे शक्य नसते, आणि या प्रसाधनाशी मूळ विचार एकरूप होणेही शक्य नसते, चिंतनशील मन नुसता विचार करीत नसते, तर तो विचार त्या व्यक्तिमत्वाने रंगलेलाही असतो. इरावतींचे मन हे असे चितनशील मन असल्यामुळे त्यांचा निबंध ललित आणि वैचारिक यांच्या सीमारेषेवर वावरत असतो. कित्येकदा तो वैचारिकाच्या बाजूने अधिक झुकतो आणि मग विचार म्हणून ती मांडणी कितीही रेखीव झाली, तरी ती आपला जिवन्तपणा हरवून बसते. कित्येकदा हा निबंध आपल्याच अनुभवाची संगती लाविताना हरवून जातो आणि मग विविध अनुभवांच्या संगतीचे सूत्र हरवल्यामुळे विस्कळित वाटू लागतो. पण हे दोन्ही प्रकार त्यांच्या लिखाणात पुन:पुन्हा घडतात हे मान्य केले, तरी त्यामुळे या निबंधाचा वेगळेपणा संपत नाही. मी निबंध शब्द वापरतो आहे खरा, पण इरावतींच्या सगळ्याच लिखाणाचे स्वरूप नेहमीच निबंधासारखे असेल, असे नाही. कधी तो निबंध असतो, कधी त्या नुसत्याच आठवणी असतात. कधी प्रवासवर्णन असते, कधी त्यात निरनिराळ्या व्यक्तिरेखा असतात; या ललितनिबंधात इरावतींच्याबरोबर त्यांच्या मुली, जावई, मुले, पती, मित्र हे सगळे डोकावून जातात. कित्येकदा तर ही नावे नुसती नावे म्हणून शिल्लक राहत नाहीत. तीही आपापले व्यक्तिमत्त्व घेऊन इरूच्या वाङमयात हक्काने प्रवेश करितात.

 ही कल्पिताची सृष्टी आहे. तिला वास्तवाचे निदान स्थलकालनिबद्ध वास्तवाचे संदर्भ नसावे, हे बंधन इरावतीबाईंनी कधी पाळलेले दिसत नाही. आणि या स्थलकालनिबद्ध वास्तविक सत्याने त्यांच्या वाङमयातील सार्वत्रिक सत्याला कधी अडथळा आणिलेला दिसत नाही. स्थलकालाच्या