पान:Gangajal cropped.pdf/137

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४४ / गंगाजल

 बालपणी जे जीवन ती जगली, त्याच्या आठवणी एकदम काल घडल्याप्रमाणे ती सांगू लागते. आणि ज्या वेळी ती लहान होऊन बोलू लागते, त्याच वेळी आपल्या मोठ्या आईशी समरस होऊन ती तिचे दु:ख समजून घेत असते. कारण हे दु:ख जणू तिच्या आईचे नव्हतेच. सासरी गेलेल्या आपल्या मुलीच्या आठवणीने व्याकूळ झालेली इरावती आपल्या बालपणात आपली मुलगीही पाहते आणि आपली आईही पाहते. वेगवेगळ्या पातळ्यांशी समरस होण्याची इरावतींची शक्ती, भूत-वर्तमान आणि भविष्य या काळांचे जीवन एका क्षणी जगण्याची तिची जिद्द तिला एकाच क्षणात परकरी पोर, अल्लड तरुणी आणि प्रौढ आई करून टाकिते. आणि सारेच अनुभव ती दरक्षणी जिवंतपणी भोगीत असते. हा अनुभवांचा जिवंतपणा, विचार आणि भावना या सगळ्यांना आपल्यात समावून घेत असतो आणि तरीही पुन्हा हे सगळे कुठूनतरी दुरून न्याहाळणारी तटस्थ इरावती या सर्वांचा एकूण मानवी जीवनातला अर्थ लावीत असते. तो अर्थ सर्वांना समजावून सांगण्यासाठी धडपडणारी मास्तरीण तीच असते. एका निबंधात बाईंनी म्हटले आहे की, मुंग्यांना द-याखोच्या आणि पर्वत जाणवतच नसतात. आपणाला सपाट वाटणाच्या सडकांवर पडलेला प्रत्येक खळगा ही त्यांच्या लेखी दरी असेल आणि प्रत्येक उंचवटा त्यांच्या लेखी पर्वत असेल. आपल्याला ज्या दर्‍या आणि पर्वत जाणवतात, त्या दर्‍या आणि ते पर्वत मुंग्यांना जाणवण्याचा संभव फार कमी.

 ज्या इरावतीने हे लिहिलेले आहे, त्याच इरावतीने शत-शतकांच्या संस्कृतीच्या अभ्यासाने समृद्ध झालेले आणि सर्व प्रकारच्या तृप्तीने बहरलेले आपले एकाच वेळी लिप्त आणि विरागी असणारे मन सर्वांना उकलून दाखविण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मोठी माणसे मुद्दाम मुलांच्या जवळ जाण्यासाठी बोबडे बोलू लागली, म्हणजे मुलांना जसे काही ओळखीचे, काही दूरचे, काही जिव्हाळ्याचे आणि काही परके असे जाणवते, तसा प्रकार इरावतींचे लिखाण वाचताना सारखा घडतो. चिंतनशीलतेची, संवेदनांची अफाट क्षमता असणारे इरावतींचे वत्सल मन त्यांच्या निबंधांत ठिकठिकाणी व्यक्त होत राहते. म्हणून त्यांना नव्या मराठी ललित-निबंधाचे अग्रदूत असे म्हणावयाचे. एरव्ही, अशा कोणत्या वाङमयप्रकाराचा जाणीवपूर्वक विचार त्यांनी केलेला दिसत नाही.

 ठरलेली मते सजवून मांडणारा निबंध आणि चिंतनशील मनाचा