पान:Gangajal cropped.pdf/136

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १४३


त्यांची क्षमता मंदावलेली असते. आणि ज्यांची इंद्रिये रंग-गंधांच्या जाणिवांना हपापलेली असतात, ऐंद्रिय संवेदनेची प्रत्येक छटा ज्यांच्या मनाला जिवलग मैत्रिणीप्रमाणे मिठी घालते, त्यांची पुष्कळदा घटनांचा अर्थ लावण्याची क्षमता बोथट झालेली असते. इरावर्तीच्या बाबतीत घडले आहे ते असे की, त्यांच्या बौद्धिक क्षमतेने इंद्रियांची क्षमता अधिक डोळस केलेली आहे. त्यांच्या इंद्रियांच्या क्षमतेने बुद्धीचा काही प्रमाणात विकासच घडविलेला आहे, आणि कडे-खांद्यावर मुले घेऊन समाधानाने अडखळत चालणा-या गृहिणीप्रमाणे त्यांच्या विशाल व्यासंगाने आद्य मानव- संस्कृतीपासून वर्तमानकाळापर्यंत आपली सौंदर्यबुद्धी व तर्कविलास यांच्यासह लीलया, हसत-हसत आणि नकळत प्रवास केलेला आहे.

 असे हे तीनपदरी मन इरावतींच्या लिखाणात एका एकसंध व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून अवतीर्ण होते. आणि म्हणून इरावर्तीचे लिखाण वाचताना पुष्कळदा वाचकाचे मन भारावून जाते, गोंधळून जाते. शास्त्रज्ञ आणि कवी असणारी ही गृहिणी ज्या वेळेला हळूच जवळ घेऊन कुरवाळीत असते, प्रकृतीची वास्तपुस्त करीत असते, त्या वेळी उगीचच हे जाणवत राहते की, हा जिव्हाळा खरा असला, तरी केवळ आपल्यापुरता मर्यादित नाही. कालच उत्खननात सापडलेल्या अस्थींचे सांगाडे हिने इतक्याच हळुवारपणे कुरवाळले असतील; आणि उद्या हिमालयाच्या सरहद्दीवर जिवंत माणसांच्या कवट्यांची मापे आणि रक्तांचे नमुने गोळा करण्यासाठीही जाणार असेल; ज्या कौतुकाने ही आपल्या पाठीवरून हात फिरवीत आहे, त्याच कौतुकाने ही उद्या उमलणाच्या पानाफुलांकडे पाहील; आणि दर वेळी कुंती-गांधारीपासून मध्ययुगीन स्त्रीपर्यंत आणि भारतीय स्त्रीपासून युरोपीय स्त्रीपर्यंत सर्व देशांत, सर्व काळांत जी आदिमाता वावरत होती. तिच्याविषयीचे विचार हिच्या मनात घोळत असतील. आणि एकदा असे जाणवू लागले की, शेजारी खुर्चीवर बसून खाद्यपदार्थाच्या चर्चा करणारी ही स्त्री जवळ असूनही खूप दूर गेल्यासारखी वाटू लागते. आपली असून आपली नसणारी, सर्वांची असून कुणाचीच नसणारी, मिठीच्या आटोक्यात असून फार मोठ्या आकारामुळे कवेत न सापडणारी, अशी ही चमत्कारिक, तरीही ओळखीच्या मनाची स्त्री एकदम मन भारावून टाकते; तितकेच गोंधळून टाकिते.

 कारण इरावतींच्या मनात सगळे अनुभव एकाच वेळी ताजे असतात.