पान:Gangajal cropped.pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १४१


व्यक्त होत होते. महायुद्धोत्तर काळात मराठी लघुनिबंध फार मोठ्या जोमाने विकसित झाला असे म्हणता येणार नाही, तरी सुद्धा ललितनिबंधातील खरी कलात्मकता आणि खरे लालित्य याचनंतरच्या काळात अभिव्यक्त झाले. विंदा करंदीकर, श्रीनिवास कुलकर्णी, पाडगावकर आणि या सर्वांना काकणभर सरस असणारा अनेकपदी, गुंतागुंतीच्या, सूक्ष्म, भावगर्भ व विचारगर्भ अनुभवांना शब्दबद्ध करणार्‍या दुर्गा भागवत यांचा ललितनिबंध या कालखंडातील आहे. ज्याला ख-या अर्थाने एखाद्या वाङ्मयप्रकाराचा विकास म्हणता येईल. तो या लेखकांच्या ललितनिबंधामध्ये जाणवतो. इरावतीबाईंच्या ललितनिबंधाकडे या नव्या आणि ख-याखु-या ललितनिबंधाचा अग्रदूत म्हणून पाहिले पाहिजे.

 इरावतींचे मन त्यांच्या विशिष्ट जीवनक्रमामुळे तीन पातळ्यांवर वावरणारे मन होते. आपण संसार मांडलेल्या गृहिणी आहो, पत्नी या नात्याने व माता या नात्याने आपणांवर पडणाच्या जबाबदा-या आपण पार पडल्या पाहिजेत. ही गृहिणीची भूमिका त्यांच्या मनातून काही बाजूला सरकली नाही. त्या एक कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या, असे म्हणणे त्यांच्यावर थोडेसे अन्यायकारक होईल. कारण संसार त्यांनी कर्तव्य म्हणून पतकरिलेला नव्हता, गृहिणीची भूमिका कर्तव्य म्हणून पार पडलेली नव्हती. मनाने सुसंस्कृत असणा-या आणि जीवनात रस घेणा-या या विदुषीला आपण स्त्री आहोत, गृहिणी आहोत. याची उपजत जाणीव होती. मातृत्वात आपल्या जीवनाची परिपूर्ती आहे, याचीही उपजत जाणीव होती. म्हणून त्या घरात, संसारात, आपल्या प्रिय पतीत, मुलाबाळांत मनाने समरस झालेल्या आणि रमलेल्या आहेत. तो जण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक उपजत धर्म आहे. त्यात कर्तव्याच्या भावनेपेक्षा अंगभूत आपलेपणाची भावना अधिक महत्वाची आहे. या गृहिणीपदातून निर्माण झालेले मन हा इरावतींच्या मनाचा एक कायमचा भाग आहे. कोणत्याही प्रश्नाचा विचार करिताना आपण एक सांसारिक स्त्री आहो, या जाणिवेचा विसर त्यांना कधी होत नाही.

 पण ही सांसारिक स्त्री दुस-या बाजूने समाजशास्त्रज्ञ आहे. समाजशास्त्राच्या अध्ययनात एकतर त्यांना संपूर्ण भारतभर हिंडावे लागले. भारताच्या बाहेरही व्याख्यानांच्या निमित्ताने, अभ्यासाच्या निमित्ताने पाश्चात्य जीवनात त्यांना वावरावे लागले; आणि दुसरे म्हणजे विविध जाती,