पान:Gangajal cropped.pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १४० / गंगाजल


कथा, कधी आठवणी, कधी संवाद, कधी दिलखुलासपणाचा भास निर्माण करणारी पण योग्य ठिकाणीच घेऊन जाणारी विषयांतरे हा सगळा सजावटीचा भाग होता. विविध कारागिरीने सजविलेल्या या मखरात ठराविक बोधाचा गणपती निश्चलपणे मांडी घालून बसलेला असे. कुणाची सजावट कृत्रिम पण देखण्या फुलांची होती; कुणी या फुलांच्याऐवजी वनश्री आणि झाडेझुडपे, पाने-फुले, वारे-तारे गोळा करून आणली होती; कुणी मखर म्हणून वादविवाद करणारे जय-विजय दारावर उभे केले होते; पण ती होती सगळी सजावटच.

 हा निबंध रंजक नव्हता, आकर्षक नव्हता, किंवा वाचकांचा आवडता नव्हता, असा याचा अर्थ नाही. कारागिरी आणि करमणूक यांतही वाचकांना बांधून ठेवण्याचे सामर्थ्य असतेच. तिथेही विरंगुळा असतोच; पण लेखनातील ही आकर्षकता आणि मोहकता म्हणजे लालित्य नव्हे; ती कलात्मकता नव्हे; एवढेच येथे सुचवावयाचे आहे. लघुनिबंध म्हटले तरी निबंध, ललितनिबंध म्हटले तरी निबंध, आणि निबंध म्हणजे मुद्दा पटवून देणे, ही जोपर्यंत भूमिका आहे, आणि जोपर्यंत गुजगोष्टी तात्पर्यासाठी आहे, तोपर्यंत सगळेच प्रकार विशेष मांडणीचे ठरतात. प्रकृती ठरीव, मुद्दा सांगणारी आणि सजावट शोभेची. या वर्तुळाला छेद देता येणे या ललितनिबंधाला शक्य नव्हते. कारण वर्तुळाच्या बाहेर पडण्यासाठी लागणारी खरी चिंतनशीलता किंवा खरी संवेदनक्षमता फडके, खांडेकर काणेकर यांच्या प्रकृतीतच नव्हती. म्हणून हा वाङ्मयप्रकार १९४० नंतर क्रमाने कोमेजला होता. १९४५ नंतर तर तो सुकल्यासारखाच वाटत होता. शेवटी रंजक उपदेशाला कलेचा जिवंतपणा लाभेल. ही अपेक्षाच चुकीची होती.

 या वातावरणात इरावतींच्या ललित-निबंधाने आपली पहिलिवहिली पावले टाकली. बाईंच्याबरोबर आणखी एका लेखिकेचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ती लेखिका म्हणजे कै.कुसुमावतीबाई देशपांडे ह्या होत. कुसुमावतीबाईंच्या आकलन-अवलोकनाचा परिघ आणि खोली यांना फार मोठ्या मर्यादा होत्या भोवतालच्या निसर्गजीवनाचे हळुवारपणे चित्रण करण्याचा प्रयत्न करतानाही त्या सांकेतिकता पूर्णपणे बाजूला सारू शकत नव्हत्या; पण या सार्‍या मर्यादा मान्य करूनही कुसुमावतीबाईंच्या रूपाने हळवे, स्वप्नाळू आणि खरेखुरे संवेदनक्षम मन मराठी ललितनिबंधात प्रथमच