पान:Gangajal cropped.pdf/129

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३६ / गंगाजल


म्हटले आहे की, आपल्या मनात वेळोवेळी अनेक अनुभव जागे होत असत. ह्या अनुभवांना नेहमीच कथेचे अगर निबंधाचे रूप देता येणे शक्यही वाटेना, इष्टही वाटेना; म्हणून आपण वेगळ्याच प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी लघुनिबंध आपल्या वाचनात त्यानंतर आला. इ.स.१९२७ साली आपल्या ललितनिबंधांना आरंभ करिताना त्यांच्या डोळ्यांसमोर दुसरे काही नव्हते. कदाचित खांडेकरांना असे सुचवायचे असेल की, फडके आणि आपण या दोघांनी एकच वाङमयप्रकार जरी निर्माण केलेला असला, तरी फडके यांची प्रेरणा इंग्रजीतील हा वाङमयप्रकार मराठीत आणण्याची होती. भाऊसाहेबांची प्रेरणा मात्र स्वत:ला जाणवणाऱ्या अनुभवांना आकार शोधण्याची होती. पण हा वाद येथे संपणारा नाही. कारण अनंत काणेकरांनी आपले निबंध लिहिण्यास १९३३च्या सुमारास आरंभ केला. पण त्यांचेही म्हणणे असेच आहे की, त्या वेळपर्यंत आपल्या डोळ्यांसमोर फडके किवा खांडकेर यांचा ललितनिबंध नव्हता.

 'मराठीतील ललित-निबंधाचा जनक कोण?' याचे उत्तर इतक्या सरळपणे देता येणे शक्य नाही. कारण फडके-खांडेकरांच्याही पूर्वी शिवरामपंत परांजप्यांचे निबंध होते. वत्सलावहिनींची पत्रे होती. अच्युत बळवंत कोल्हटकरांचे विविध लेख होते. वैचारिक निबंध कोणत्या ठिकाणी संपला आणि वैचारिकाची जागा ललित-निबंधाने नेमक्या कोणत्या ठिकाणी घेतली, ही विभाजक रेषा फारशी स्पष्ट असणे कधीच शक्य नसते. कारण वैचारिक निबंधातही आपला मुद्दा समजावून सांगण्यासाठी दृष्टान्त आणि कहाण्या यांचा वापर केलेला असतोच; या दृष्टान्तांची आणि कहाण्यांची लांबी रुंदी किती असेल, यालाही नियम नसतो. त्यांची संख्या किती असावी, यालाही बंधन नसते. दासोपंतांच्यासारखा एखादा गीताभाष्य- लेखक अद्वैत-तत्वज्ञान सांगताना लांब-रुंद अशी कहाणी सांगून जातो.

 एकच मुद्दा मनावर ठसविण्यासाठी ज्या वेळी अनेक गोष्टी सांगितल्या जातात, किंवा ज्या वेळी एका मुद्दयाच्या अनेक बाजू स्पष्ट करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या जातात, त्या वेळी विवेचन तर्कशुद्ध आणि तर्कप्रमाण नसते. म्हणून त्या ठिकाणी ललितनिबंधांचा अवतार झाला, असे समजावे. ही भूमिका नुसती ढोबळच नसून उघडउघड चुकीची आहे. कारण ह्या भूमिकेप्रमाणे पाहता ठरलेला बोध देण्यासाठी गोष्टी सांगणारे इसाप आणि विष्णुशर्मा आद्य लघुनिबंधकार ठरण्याचा संभव आहे. एक मुद्दा