पान:Gangajal cropped.pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.








प्रस्तावना


 इरावतीबाई कर्वे यांच्या ललितनिबंधांचा हा तिसरा आणि शेवटचा संग्रह प्रकाशित होत आहे. ललितवाङ्गय हा इरावतींच्या आवडीचा व वाचनाचा खास भाग असला, तरी त्यांच्या लेखनाचा आणि चिंतनाचा तो खरं म्हणजे खास भाग नव्हता. त्यांचे मन फुलपाखरांप्रमाणे अधूनमधून वेगळ्या-वेगळ्या विषयांचा आस्वाद घेत इतस्तत: उडणारे असे नव्हते. जन्मभराचा व्यासंग त्यांनी एकाच विषयाचा केला, तो समाजशास्त्राचा. पण समाजशास्त्राचा व्यासंग करिताना एका जिवंत, संवेदनाशील व्यक्तीच्या मनात जी अस्वस्थता निर्माण होते ती अस्वस्थता, आणि जी वादळे निर्माण होतात तशी वादळे इरावतींच्याही मनात निर्माण होत: आणि मग नित्याच्या अभ्यासाशी एका बाजूने जोडलेले तर एका बाजूने शास्त्राच्या चौकटीतून मोकळे झालेले असे काही अनुभव त्यांच्या मनात तरळू लागत. या अनुभवाना अभिव्यक्तीची वाट मोकळी करून देताना इरावतींचा ललितनिबंध आकार धारण करीत आला आहे.

 मराठी वाङमयात काही नियतकालिकांना नव्या प्रयोगांच्या दृष्टीने विशेष मानाचे असे स्थान आहे. अशा प्रकारचे ‘अभिरुची' नावाचे एक नियतकालिक पूर्वी बडोद्याहून निघत असे. त्या ‘अभिरुची' ची आणि प्रथमदर्शनी तरी तुटक, फटकळ आणि तुसड्या वाटणाच्या इरावतींची रुची- कशी कोण जाणे! पण जूळली आणि बाई ‘अभिरुची'मध्ये लिहू लागल्या. या शास्त्रीय लिखाणाखेरीज असणा-या मराठी लेखनाचा एक संग्रह इ.स १९४९ साली 'परिपूर्ति' या नावाने प्रकाशित झाला. लेखनाच्या आरंभापासूनच