पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015


पक्ष्यांची उपयुक्तता

कधी कधी असे म्हटले जाते की मानवाशिवाय पक्षी जगू शकतात पण ह्या पृथ्वीतलावर पक्षी नसतील तर मानवाला जगणे मुश्कील होऊन जाईल. मानवासाठी पक्ष्यांची उपयुक्तता अनन्यसाधारण आहे.

कीडनियंत्रक

जगात कीटकांच्या लक्ष्यावधी प्रजाती असून त्यांचा प्रजनन दर एवढा जलद असतो की पक्ष्यांच्या अनुपस्थितीत केवळ एका वर्षात कीटक व त्यांचे सुरवंट संपूर्ण जगातील हिरवळ संपवून टाकू शकतात. किटक व त्यांचे सुरवंट पक्ष्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक होत. एक चिमणीची जोडी दिवसभरात २२० ते २६० कीटक-अळ्या पिल्लांना भरविते असे आढळून आले आहे. कीटक व त्यांचे सुरवंट उभ्या पिकांचा फन्ना उडवितात व जगातील शेतीउत्पन्नाचे अब्जावधी रुपयांचे नुकसान करतात. शेतात नांगरणी चालू असताना अनेक बगळे, कोतवाल तसेच नीळकंठ पक्षी उडणाऱ्या किटकांना संपवतात.

उपद्रवी जीवांचे संहारक

घुबड, पिंगळे, नारझीनक (Kestrel), कापशी, शिक्रा, बाज, गरुड इ. प्रजातीचे मांसाहारी शिकारी पक्षी शेतीप्रदेशातील उंदरांचा संहार करतात. म्हणूनच भारतीय पुराणात विशेषतः घुबडांना लक्ष्मिचे वाहन मानले गेले आहे. एका उंदरांची जोडी वर्षभरात ८८० उंदरांची प्रजनन करू शकते. उंदीर भारतात फार मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान करतात. दुर्दैवाने आपल्या देशात विविध अंधश्रद्धा व जादूटोण्याच्या नावाखाली घुबडांचे शिरकाण केले जाते. अनेक युरोपिअन (नेदरलँड्स, इंग्लंड, स्वीडन) तसेच मध्य-पूर्व एशियाई (इस्त्रायल, सौदी अरेबिया) देशांमध्ये घुबडांनी शेतात राहावे म्हणून त्यांच्यासाठी कृत्रिम घरटी बसविली जात आहेत. त्यामुळे त्यांचा शेतातील उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. जगात उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांचा उच्छाद नियंत्रित करण्यासाठी विविध विषारी औषधांच्या खर्चापायी करोडो रुपये खर्च केले जातात.

१२