पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015



विविधता उपलब्ध असून एखादया जाणकार मित्राच्या सल्ल्यानेच कॅमेऱ्याची निवड व खरेदी करावी. छायाचित्रे काढताना आपण ज्या ठिकाणी पक्षी निरीक्षण केले त्या ठिकाणच्या अधिवासाची छायाचित्रे जरूर काढावीत.

पक्षी निरीक्षणाला जाताना करावयाचा पोशाख

पक्षी निरीक्षणाला जाताना आपण कुठे जातोय ह्याचा विचार करून तयारी करावी. घनदाट, सदाहरित जंगलात, खारफुटीच्या वनात तसेच झुडूपी जंगलात जायचे असेल तर साधारणतः हिरवे कपडे (फुल पँट व लांब बाह्याचे शर्ट) घालावेत. अशा ठिकाणी तसेच पाणथळीच्या ठिकाणी जाताना डास प्रतीरोधक मलम (Mosquito Repellent Cream) सोबत ठेवावा. वाळवंटात, माळरानावर तसेच पानगळीच्या जंगलात (उन्हाळ्यात) जायचे असेल तर खाकी कपड़े योग्य ठरतात. अशा ठिकाणी त्वचा रक्षक मलम (Sun-screen Lotion) सोबत ठेवावा, तो वापरल्यास त्वचा करपत नाही.

हिरवी अथवा खाकी टोपी (कॅप अथवा हॅट) घातल्यास पक्षी बघताना आणखी फायदे असे की डोळ्यांना उन्हाचा त्रास होत नाही तसेच चेहेच्यावरची त्वचा करपत नाही.

पायात नेहमी शूज घालावेत. त्यामुळे काटया-गोट्यापासून तसेच कीटक व सर्पदंशापासून पायांचे रक्षण होते. घनदाट, सदाहरित जंगलात रक्तपिपासू जळवा (Leech) असतात. अशा ठिकाणी जाताना विशिष्ट प्रकारचे पायमोजे (Leech-proof Socks) मिळतात. ते आवश्य घालावेत.

हे विसरू नका

पक्षी निरीक्षणाला जाताना आपने सर्व सामान पाठीवरच्या बॅगेत (रकसॅॅक) ठेवावे. त्यामुळे आपले दोन्ही हात दुर्बण, कॅमेरा इ. वस्तू सांभाळण्यासाठी मोकळे राहतात. जरी आपल्याला लवकर परत यायचे असले तरीही, नेहमी रकसॅॅकमध्ये काहीतरी खायचे जिन्नस चिवडा, बिस्किटाचा पुडा, चॉकलेट, केक इ.) तसेच पाण्याची भरलेली बाटली ठेवावी.

माझ्या नोंदींचे मी काय करू?

पक्षीनिरीक्षकांना अनेक वर्षे पक्षी निरीक्षण केल्या नंतर माझ्या नोंदींचे मी काय करू?’ हा प्रश्न पडतो. अनेक जण वृत्तपत्रात लेख लिहून आपले निसर्ग ज्ञान समाजापर्यंत, नव्या

१०