पान:Bhovara-Iravati Karve.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९

 सुटका

 "ह्या वेळी बराच त्रास झालेला दिसतो आहे तुला. फारच दमलेली दिसतेस."
 "तसा त्रास नाही झाला; पण बैलगाडीचा प्रवास आणि चालणं बरंच झालं आणि मापं घ्यायला माणसं इतकी मिळाली, की आम्ही रात्रंदिवस काम करीत होतो; त्यामुळे शीण आला आहे. जाईल दोनतीन दिवसांत.”
 लांबचा प्रवास करून मी घरी आले होते. घरातील सर्व गोष्टींचा आस्वाद परत नव्याने घेत होते. रॉकेलचा कंदील किंवा मेणबत्ती यांच्या उजेडात दोन आठवडे वावरल्यावर घरचे विजेचे दिवे विलक्षण तेजस्वी वाटत होते. बऱ्याच दिवसांत उघड्यावर नदीत किंवा आडाच्या पाण्याने अंग धुतल्यावर स्वतंत्र न्हाणी खोलीत साबण लावून ऊनऊन पाण्याने आंघोळ केल्याने मन व शरीर कसे सुखावले होते! बऱ्याच दिवसांनी खरोखर स्वच्छ कपडे अंगावर आले होते. भात, भाजी, पोळी, आमटी, चटणी, लोणचे वगैरे रोजचेच जेवण पंचपक्वान्नांसारखे वाटत होते. गाडीतून उतरल्याबरोबर फाटक उघडून आंत येते, तो दोघा कुत्र्यांनी अंगावर उड्या मारमारून स्वागत केले होते. त्यांच्या धाकट्या मालकीणीने येऊन अंगणांतच मला मिठी मारली होती व इतर माणसे बाहेर यायच्या आत तिघेजण माझ्या भोवतीभोवती घुटमळून मला पुढे पाऊलच घालू देत नव्हती. पण इतरांनी येऊन ह्या प्रेमाच्या वर्षावातून माझी सुटका केली व मी आत आले. त्या क्षणापासून आतापर्यंत मी बाहेरचे जग विसरले होते- विसरले म्हणण्यापेक्षा ते जग किती निराळे आहे; किती लांब आहे; आता त्याचा आपला संबंध नाही, असे मला सारखे वाटत होते. पण ह्या मोहांतून