पान:Bhovara-Iravati Karve.pdf/87

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ८७

मोठी सरोवरे त्याने खास पाहिली होती. एवढेच नव्हे; तर ह्या सरोवराच्या पाण्यातून ज्वालामुखी उफाळून निघाले, तेही मानवाच्या हयातीतच; आणि पाण्याने भरलेली रिफ्ट व्हॅलीतील सरोवरे पर्जन्ययुग संपल्यानंतर हळूहळू लहानलहान होत गेलेली मानवाने पाहिली आहेत. नायरोबीच्या शेजारी जी रिफ्ट व्हॅली आहे तिच्यामध्ये काही थोडी सरोवरे आहेत. बाकी सबंध दरीचा तळ म्हणजे खाराने भरलेले एक ओसाड, निर्वृक्ष वाळवंट आहे. त्या क्षाराच्या ढिगाखाली अडीच तीन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन मानवाची हत्यारे शोधावयाची म्हणजे किती उकराउकरी करावी लागते, किती चाल करावी लागते व दिवस दिवस भटकून दोनचार हत्यारे हाती आली तर स्वर्ग हाती लागल्याचा आनंद होतो. भारतात बऱ्याच शोधाअंती अशा काही जागा सापडल्या आहेत की तेथे दिवसभर काम केले तर शंभरपर्यंतदेखील हत्यारे सापडतात. पण ह्या नायरोबी शेजारच्या ग्रेगरी रिफ्ट व्हॅलीमध्ये जे दृश्य दिसले ते काही अवर्णनीयच. दरीच्या तळाशी प्रेक्षकांसाठी जायला म्हणून एक रस्ता केलेला आहे व ठिकठिकाणी ७-८ फूट उंचावर उभे राहून पाहायसाठी चौथरे केलेले आहेत. एकेका चौथऱ्यावर उभे राहून खाली पाहिले म्हणजे साधारण २५ चौरस फुटांच्या जागेमध्ये दगडाच्या उत्तम उत्तम हत्यारांचा खच पडलेला दिसतो. त्याचप्रमाणे त्याच दरीच्या एका भिंतीत एक मोठी गुहा आहे. ही गहा एके काळी वरपर्यंत पाण्याने भरलेली होती. पाणी जसजसे खाली जायला लागले, तसतशी माणसे गुहेत येऊन राहायला लागली. आणि पाणी ओसरेल तसतशी वस्ती पाण्याच्या जवळजवळ जात अगदी दरीच्या तळाजवळ आली. इतके होईतो पर्जन्ययुग संपून हल्लीचे कोरडे युग सुरू झाले होते. दरीतले पाणी आटले होते. एके काळी तेथे मोठमोठी गोड्या पाण्याची सरोवरे होती. अरण्ये होती, रान पशूंनी भरलेले होते- सरोवरे माशांनी भरलेली होती, शेतीचा मागमूस नाही अशा काळी केवळ दगडाच्या हत्यारांनी शिकार करणाच्या मानवाचे जीवन सुसह्यच नव्हे तर बऱ्याच अंशी खाण्यापिण्याची ददात नसलेले असे असणार. खणायच्या उपयोगाचे अणकुचीदार दगड, घाव मारून लाकूड, पशूची तंगडी वगैरे तोडता येईल इतपत धार असलेले कुऱ्हाडीच्या पात्यासारखे दगड, पशूचे कातडे सोलण्यासाठी व खरवडून साफ करण्यासाठी लहान लहान पाती असलेले दगड हजारोंनी डोळ्यांपुढे दिसत होते. मधूनमधून लिंबाएवढे व तशाच आकाराचे दगड तीनतीनांच्या पुंजक्याने आढळत होते. अशा तऱ्हेचे