पान:Bhovara-Iravati Karve.pdf/85

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेभोवरा / ८५

ऱ्होडेशियातील लिव्हिंग्स्टन गावापासून तो टांगानिका सरोवराजवळील अँबरकॉर्न शहरापर्यंत प्रवास केला. सकाळी सुरुवात करायची, वाटेत प्राचीन मानवाचे अवशेष जेथे जेथे सापडले ती स्थळे बघावयाची, संध्याकाळी कोठेतरी मुक्काम, परत प्रवास, असे तीन दिवस चालले होते. टांगानिका सरोवरापासून रिफ्ट व्हॅलीचे खरे जवळून पहिले दर्शन झाले खरे दर्शन म्हणायचे कारण म्हणजे वास्तविक लिव्हिंग्स्टनच्या भोवतालचा प्रदेश, झांबेझी नदीवरील प्रचंड व्हिक्टोरिया धबधबा, नदीचे पात्र व वाहण्याची दिशा ही सर्व रिफ्ट व्हॅलीचेच एक अंग आहे. पण रिफ्ट व्हॅली म्हणजे काय हे समजायला प्रथम टांगानिका सरोवरच पाहावे लागते.
 रिफ्ट म्हणजे भेग, चीर. व्हॅली म्हणजे दरी किंवा खोरे. साधारणपणे आपल्या नेहमीच्या पाहण्यात ज्या दऱ्या व खोरी येतात ती पाण्याच्या प्रवाहामुळे उत्पन्न झालेली असतात. उंच डोंगरावरून पाणी खाली वाहात असताना ते आजूबाजूची माती धुपून आणते; एवढेच नव्हे, तर स्वतःचे पात्रही खोल व रुंद रुंद करीत जाते. हिमालयात, आल्प्स पर्वतात वगैरे भागांत पूर्वीच्या काळी लांबवर वाहात असलेल्या हिमनद्यांनी प्रचंड पात्रे खोदली आहेत. ह्या दऱ्या हजारो वर्षे पाणी वाहून वाहून तयार झालेल्या असतात. पर्वतांच्या रांगा जरी असल्या तरी खोऱ्याच्या सपाटीशी उतरत कोन करीत आलेल्या असतात. ह्याउलट रिफ्ट व्हॅली ही भूभंगाने झालेली असते. काही कारणांमुळे जमीन दुभागते, तिला मोठमोठ्या चिरा पडतात आणि ह्या चिरा म्हणजेच रिफ्ट व्हॅली. अशा चिरा का पडाव्यात, याचे कारण अजून सर्वस्वी उमजलेले नाही. तरीपण शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, पृथ्वीच्या पोटात कोठेतरी लाव्हा रसाचे तळेच्या तळे साठून मोठा भूभाग वर उचलला जातो व जो भाग उचलला जात नाही किंवा दोन्हीकडचा भाग उचल्यामुळे खचतो, त्यालाच रिफ्ट व्हॅली म्हणतात. आफ्रिकेत अँबिसीनिया, सोमालीलँड, युगांडा, केनिया, टांगानिका व ऱ्होडेशिया हा सबंध भूभाग सुमारे ५००० फूट उंच उचलला गेला आहे.आणि त्यामुळे ठिकठिकाणी भेगा पडून रिफ्ट व्हॅली निर्माण झाल्या आहेत. एवढा प्रचंड भूभाग वरती उचलण्याच्या क्रियेमुळे काही गमतीदार प्रकार घडतात. त्यांतला एक म्हणजे रिफ्ट व्हॅलीचा तळ पुष्कळदा समुद्रसपाटीच्या खाली जातो. पश्चिम आशियातील जॉर्डन नदीचे खोरे समुद्रसपाटीपासून १००० फूट खाली आहे. तसेच टांगानिका सरोवर, बहुतेक ठिकाणी