पान:Bhovara-Iravati Karve.pdf/79

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
   ७
  द्वारका

 एक झाड नाही, झुडूप नाही, कसलाही निवारा नाही. सूर्य रणरण तळपत होता. संध्याकाळ होण्याची वेळ असूनसुद्धा हवेत गारवा नाही. भोवतालची तापलेली वाळू थंड होण्यास निदान मध्यरात्र तरी लोटावी लागेल असे. असूनही मी देवळाचा निवारा सोडून समुद्रकाठी आले. देवळातील दृश्यास विटून बाहेर यावे व बाहेरचे वैराण जग पाहून आत जावे असे येथे आल्यापासून चालले आहे. डाकोरनाथचे विलास व भोग पाहून मनात काही भक्ती रुजत नाही. देवाने उठावे- देवळाची दारे उघडली जावीत- मूर्तीचे दर्शन व्हावे, अशी हुरहूरही लागत नाही. देवाचा कार्यक्रम मोठ्या पगाराच्या सरकारी अधिकाऱ्यापेक्षाही काटेकोर. सकाळी आरती व नैवेद्य, मग स्नान व पूजा आणि मोठा नैवेद्य, मग दुपारची वामकुक्षी, मग संध्याकाळी सूर्य कलला म्हणजे उठून भक्तांना दर्शन, परत आरती-शेजारती व शयन ह्या चक्रात देवाचा इतरेजनांशी संबंध फारच थोडा येतो. जो जास्त पैसा देईल त्याला जवळून दर्शन मिळण्याची शक्यता- लोकांना पिळून काढणाऱ्यांचा, श्रीमंत, राजविलास भोगणारा हा देव त्या श्रीमंतांनाच लखलाभ होऊ दे!
 कोठे ती पूर्वीची द्वारका व कोठे हे वाळवंटातले एकाकी देऊळ कृष्णचरित्र सगळेच अद्भुताने भरलेले आहे आणि आपली पुराणे त्या अदभुतावर मात करून काळ्याचे पांढरे न् पांढऱ्याचे काळे करतात. द्वारका खरोखर कृष्णाच्या अपजयाची निशाणी. कंसाला मारून मथुरेच्या सिंहासनावर उग्रसेनाला कृष्णाने बसविले व सर्व यादवकुले मथुरेच्या आसपासच्या सुपीक यमुनाकाठी निर्भय वास्तव्य करण्याच्या विचारात