पान:Bhovara-Iravati Karve.pdf/66

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६६ / भोवरा

सगळीकडे हिरवेगार आहे की रुक्ष आहे, वेताळावरून देखावा सुंदर दिसतो की धुळीमुळे काही दिसेनासे झाले आहे, ह्याबद्दल कधी अक्षर ऐकले नाही. भोवतालची सृष्टी, झाडेझुडपे, आकाश, लहानमोठे प्राणी ह्यांत त्यांना कधी गंमत वाटली नाही. त्यांचे मन मनुष्य व त्याची एक विशिष्ट परिस्थिती ह्यांना सर्वस्वी वाहिलेले होते. पण त्यातही वर सांगितल्याप्रमाणे एक प्रकारचा अलिप्तपणा आहे. ह्याही बाबतीत त्यांच्यात व त्यांच्या थोरल्या चिरंजीवांत विलक्षण साम्य दिसते.
 त्यांच्या आयुष्याची वाट थोडी अरुंद वाटते. करमणूक काय, काम काय- सगळे एका अरुंद सीमेत आखलेले आहे. ते पूर्वी सुटीत कधीकधी पत्ते खेळत. पत्त्यांचे त्यांचे डाव म्हणजे 'लॅडिस' व 'झब्बू'. पुढेपुढे नातींबरोबर गुलामसत्ती खेळत आणि कोणी अडवाअडवीचा डाव खेळू लागले की रागवत. सुरुवातीलाच न अडवण्याबद्दल बजावीत. ह्या कंटाळवाण्या डावाला नाती व सुना अर्थातच कंटाळून जात. पण तेही आता कित्येक दिवस सुटले आहे. त्यांच्या करमणुकीचे एकमेव साधन म्हणजे वाचन. मराठी हाती पडेल ते वाचतात- फक्त आधुनिक कविता व रहस्यकथा मात्र वाचीत नाहीत. बाकी वाचून काढतात. मला वाटते, पूर्वी कादंबऱ्या फारशा वाचीत नसत. इंग्रजी वाचनात फक्त गंभीर लिखाण वाचीत. नाटके, कादंबऱ्या, कविता (अर्थातच) प्रवासवर्णने, वगैरे त्यांना वर्ज्य होती. घरात ह्या प्रकारची पुस्तके कधी हाती लागली तर पान उघडून काय आहे हे कळल्याबरोबर खाली ठेवीत. माझ्या विषयावरील पुस्तके कधी हातात घरीत नसत. आता मात्र सारा वेळ वाचतात व वर सांगितलेल्या ललित वाङ्मयाखेरीज सर्व वाचतात. माझ्या टेबलावरील एकही पुस्तक त्यांच्या तडाक्यातून सुटत नाही; आणि वाचताना त्यांना एक पुस्तक पुरत नाही तर चांगली दहा-पंधरा लागतात. ही पुस्तके पुष्कळदा इतकी रुक्ष व तात्त्विक चर्चेने भरलेली असतात की मलासुद्धा वाचायला कठीण जातात. त्यांना कळते म्हणून ते हल्ली वाचतात असे वाटत नाही. अशा एका पुस्तकाचे पानभर वाचतात, मग ते खाली ठेवून दुसरे काढतात. असा क्रम चालतो. एखादे सोपे मराठीतले पुस्तक असले म्हणजे मात्र अगदी आस्वाद घेत वाचतात. पु. ल. देशपांड्यांचा लेख त्यांच्या हातांत आला व त्यात काव्य (!) नसले, तर त्यांच्या खदखदून हसण्याने खोली दणाणते.